- संशयितांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अपयश
शहादा: तालुक्यातील म्हसावद महसुली मंडळातील शिरुड तह या अतिदुर्गम भागातील गावात सुमारे साडे सात एकर अफूची शेती पोलीस प्रशासनाने धाड टाकून जप्त केली आहे. याप्रकरणी 36 तास उलटल्यानंतरही मुख्य संशयितांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस प्रशासनाला अपयश आले आहे. संपूर्ण रात्रभर या प्रकाराची चौकशी परिसरात पोलिसांतर्फे केली जात आहे. सोमवारी सकाळी तहसीलदार यांच्या समक्ष अफूच्या शेतीचे मोजमाप करण्यात येऊन सुमारे 50 मजूरांच्या मदतीने अफूची कापणी सुरु आहे. नेमका किती किलो अफू आहे हे लवकरच स्पष्ट होईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक श्रीकांत घुमरे यांनी दिली.
सविस्तर असे, सोमवारी दुपारच्या सुमारास सुमारे साडेसात एकर परिसरात अफूची शेती केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधीक्षक श्रीकांत घुमरे व पथकाने धाड टाकून कारवाई सुरू केली. मंगळवारी सकाळी तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत परिसरातील पन्नास मजुरांच्या सहकार्याने दोन्ही क्षेत्रातील अफूचे पीक कापणीला सुरुवात करण्यात येऊन कारवाईला सुरुवात केली. ही कारवाई उशिरापर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतरच प्रत्यक्षात या साडेसात एकरातून किती किलो अफूचे उत्पादन झाले हे स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, याप्रकरणी सोमवारी पोलिसांनी दोन्ही शेतांचे मालक यांना ताब्यात घेतले होते. रात्री अधिक चौकशी केल्यावर ज्या मेंढपाळांनी ही शेती भाडेपट्ट्याने घेतली होती. त्यापैकी चार मेंढपाळांना पोलिसांनी शहादा तालुक्यातील पाडळदा येथून ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. मेंढपाळाची परिस्थिती पाहता यामागे आंतरराज्यीय टोळी असण्याची शक्यता आहे. मुख्य सूत्रधाराच्या मार्गदर्शनानुसार एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात अफूचे उत्पादन घेतले जात होते. याप्रकरणातील मास्टर माईंड अद्याप कारवाईच्या कक्षेबाहेर असल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सुमारे चार महिन्यापूर्वी मेंढपाळाची वस्ती गावात मेंढ्यांच्या साथीने वसाहतीला आली होती. यातील दोन मेंढपाळांनी सुमारे एक लाख रुपये देऊन ही शेती चार महिन्यासाठी घेतली. आदिवासी शेतकर्यांना ‘येथे खसखस मसाल्याच्या पिकाची शेती करणार आहे. चार महिन्यानंतर तुमचे शेत मोकळे करतो, तुम्हाला शेताचा ताबा दिला जाईल’, असे सांगितले. खसखस हे पीक मसाल्यात वापरले जात असल्याचे व आदिवासी शेतकर्यांना याबाबतचे ज्ञान नसल्याने या मेंढपाळांनी शेतकर्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन येथे अफूची शेती केली. कालांतराने ही बाब आपसी संघर्षातून उघडकीस आली. पोलिसांनीपर्यंत पोहोचली. त्यानंतर हा गोरखधंदा उघडकीस आला.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा अद्यापही पडद्यामागे आहे. यापूर्वी त्याने याच भागात असा प्रकार करून अफूचे उत्पादन घेतले असल्याची शक्यता अनेकांनी वर्तविली. त्यामुळे त्यांना हा भाग अफूच्या शेतीसाठी योग्य असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर यंदा मोठ्या प्रमाणात अफूची लागवड केली होती. अवघ्या काही दिवसात हे पीक परिपक्व होऊन त्याच्या विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. पोलिसांनी एकीकडे अफूच्या पिकाचे कापणी करून मोजमाप सुरू ठेवले आहे. दुसरीकडे या प्रकरणातील दोषींना जेरबंद करण्यासाठी कारवाई सुरू ठेवली आहे. तालुक्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात अफूचे उत्पादन घेतले जात असल्याचे कारवाईनंतर स्पष्ट झाले. त्यानंतर परिसरातील इतर शेतातही असा प्रकार घडला आहे. याचीही चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत स्थानिक पोलिसांच्या मदतीने हा प्रकार सुरू आहे का, एवढ्या मोठ्या प्रमाणात अफूची लागवड झाल्यानंतर गावातील तलाठी ग्रामसेवक व कृषी सहाय्यक त्याचप्रमाणे पोलीस पाटील हे याबाबत अनभिज्ञ कसे, त्यांना या प्रकाराची माहिती कशी नाही. याचाही तपास पोलीस प्रशासनाने केल्यास अशा गोरख धंद्यातील संपूर्ण साखळी उघडकीस येणार आहे.
दोषींना लवकरच जेरबंद करणार
अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी घटनास्थळी भेट घेऊन पाहणी करण्यासाठी माहिती जाणून घेतली. त्यातील दोषींना पोलीस प्रशासनातर्फे लवकरच जेरबंद करण्यात येईल. या संपूर्ण प्रकाराचा पारदर्शीपणे तपास केला जाईल. त्याचप्रमाणे परिसरात इतरही असा प्रकार घडला आहे का?याची तपासणी सुरू आहे. या प्रकारातील मास्टर माईंड व त्याची संपूर्ण टोळी लवकरच कारवाईच्या कक्षेत येईल.
– विजय पवार, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख, नंदुरबार