शिक्रापूर । शिरुर तालुक्यात सहकारी साखर कारखान्यांची अवस्था बिकट असताना आणखीन एका नव्या साखर कारखान्याची भर पडणार आहे. त्यामुळे सहकार अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा शिरुर तालुक्यातील नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.शिरुर तालुक्यात घोडगंगा हा एकमेव सहकारी साखर कारखाना होता. त्यानंतर साखर सम्राटांनी व्यंकटेश या खासगी कारखान्याची उभारणी केली. येथील सहकार अडचणीत असल्याचे सहकार क्षेत्रात बोलले जाते. व्यंकटेश वरून नेहमी वादावादी होत असल्याचेही तालुक्यातील जनतेने पाहिले आहे. घोडगंगा कारखाना अडचणीत असल्याचे अनेकांनी मान्य केले आहे. त्याचप्रमाणे व्यंकटेश हा खासगी कारखाना उभारल्यानंतर वादाला चांगलेच तोंड फुटले ते आजतागायत सुरू आहे. आता बेट भागात पराग अॅग्रो फुड्स अँड अलाईड प्रॉडक्टस प्रा. लि. या नव्याने उभारलेल्या खासगी कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात होणार असल्याचे दिसते. यामुळे शिरुर तालुक्यात एक सहकारी व दोन खासगी कारखाने असे मिळून तीन साखर कारखाने होणार आहेत.
मालकाचे नाव गुलदस्त्यात
शिरुर तालुक्यातील उभारलेल्या या नव्या खासगी कारखान्याने जाहिरातबाजी केली असली तरी खरा मालक कोण हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. या नव्या खासगी कारखान्याने सहकारावर परिणाम होणार असल्याचे जाणकारांमध्ये बोलले जात असून याचा फायदा तालुक्याला कितपत होणार असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.