शिरूड गटात काँग्रेसच्या नर्मदाबाई भील यांची बिनविरोध निवड

0

धुळे । धुळे जिल्हा परिषदेच्या शिरुड गटासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत आज माघारी अंती काँग्रेस च्या नर्मदाबाई विष्णू भील यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. जिल्हा परिषदेत काँग्रेस  आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून शिरुड गटातील काँगे्रसचे सदस्य विष्णू भील यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. या जागेची पोटनिवडणूक जाहीर होताच काँग्रेसने मयत सदस्य विष्णू भील यांच्या पत्नीलाच उमेदवारी देवून या निवडणूक रिंगणात उतरविले. तर राष्ट्रवादी काँग्रेसने भागाबाई वसंत भील यांची उमेदवारी जाहीर केली. भाजपनेही या निवडणूकीत पांडूरंग धुडकू मोरे यांना उमेदवारी दिल्याने अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत एकूण 3 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. या अर्जाच्या छाननीच्या वेळी भाजपचे उमेदवार पांडूरंग धुडकू मोरे यांच्या अर्जाला राष्ट्रवादी काँगे्रसने हरकत घेतली. मागील निवडणूकीत केलेल्या खर्चाचे विवरण दिले नसल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. दरम्यान छाननी अंती एकमेव निर्मलाबाई यांचा एकमेव अर्ज राहिल्यामुळे त्यांना बिनविरोध घोषित करण्यात आले.