अमळनेर। तालुक्यातील शिरुड येथे किसान क्रांती मोर्चातर्फे शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम 13 रोजी करण्यात आले होते. यावेळी किसान क्रांती मोर्चाचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर उपस्थित असलेले संभाजी ब्रिगेडचे संजय सोनवणे मार्गदर्शन करतांना सांगितले की, शेतकर्यांचा कोणताच पक्ष व जात नसते, शेतकरी हीच शेतकर्यांची जात व पक्ष असतो शासनाच्या धोरणामुळे जगाचा पोशिंदा उपाशी राहून आत्महत्या करीत आहे. राज्यातील शेतकर्यांचा एवढे वाईट दिवस आलेत की शेतकर्यांचा शेती माल कवडी मोल भावात विकला जातो. शेतकरी वर्गाचे महत्व दिवसेंदिवस कमी होत चालले आहे.
शेतकर्यांच्या शेतमालाला हमी भाव देण्याची मागणी
शासनाने गेल्या वर्षांपासून शेती मालाला 1 ते 3 टक्के वाढ केली तर शासकीय कर्मचार्यांच्या पगारात 14 ते 18 टक्के कर वाढ मिळते. शेतकर्यांना नेहमी कमी लेखले जाते, राज्यातील शेतकरी कर्जमाफी, नापिकी, दुष्काळी परिस्थितीमुळे आत्महत्या करीत नाही तर शासनाच्या धोरणाला कंटाळून आत्महत्या करीत आहेत. शेतकरी वीज वापरतोय किती आणि त्याला वीजबिल किती रकमेची मिळते. ह्या वाढीव विजबिलामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. त्यामुळे शासनाने शेतकर्यांना मोफत वीज द्यायला हवी शेतकर्यांची रासायनिक खतातून मोठी लूट शासन करते खतांचे भाव
नेहमी वाढतात.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी शिवाजी पाटील, नितीन पाटील, उदय पाटील, कृषिभूषण सुरेश पाटील, गोकुळ पाटील, प्रा. सुभाष पाटील, सरपंच बापूराव महाजन, ग्रा.प. सदस्य भाईदास पाटील, जयवंतराव पाटील यांच्यासह गावातील शेतकरी, तरुण, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दिपक पाटील यांनी मानले.