शिरूरमध्ये जनावरांच्या बाजारात 80 लाखांची उलाढाल

0

शिक्रापूर । शिरूरमध्ये भरलेल्या जनावरांच्या बाजारामध्ये 250 ते 300 जनावरांची आवक झाली होती. त्यात 70 ते 80 लाख रुपयांची उलाढाल झाली. काष्टी, घोडेगांव, राहुरी, लोणी प्रवरा, कान्हुर मेसाई, मोटेवाडी, केडगांव, इनामगांव येथील अनेक व्यापारी व शिरूर परिसरातील अनेक शेतकरी आपली जनावरे घेऊन विक्रीसाठी आली होती.

शिरूर तालुका हा बागायती असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पशुधन आहे. तरुण वर्ग दुग्ध व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर वळू लागला आहेत. परंतु शिरूर व शेजारील तालुक्यात जनावरांचा बाजार नसल्यामुळे अनेक शेतकर्‍यांना गाय, बैल, म्हैस खरेदीसाठी दूर जावे लागत होते. जनावरांचा बाजार शिरूरमध्ये सुरू झाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. शिरूर परिसरात अनेक दूग्ध उत्पादक शेतकरी असून त्यांना या बाजाराचा चांगला उपयोग होणार आहे. शेतकरी वर्गाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय हाताळल्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असून खर्चात बचत होणार आहे, असे अनेक शेतकर्‍यांनी सांगितले.

जातीवंत गीर गायी विक्रीसाठी
रविवारच्या बाजारामध्ये प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे हिंगणी येथील शेतकरी रामनाथ गव्हाणे यांच्या जातीवंत गीर गायी. त्यांनी सुमारे 8-9 गावरान जातीवंत गीर गायी विक्रीसाठी बाजारमध्ये आणलेल्या होत्या. त्यापैकी एका गायीने बाजारमध्येच गोंडस अशा कालवडीला जन्म दिला. जनावर बाजारमध्ये बाजार समितीने पशुपालक शेतकरी, व्यापारी, खरेदीदार यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उभारलेल्या आहेत, असे सभापती शशिकांत दसगुडे यांनी सांगितले. उपसभापती विश्‍वासकाका ढमढेरे, सचिव दिलीपराव मैड व सर्व संचालक मंडळ जनावर बाजारमध्ये शेतकरी, व्यापारी, खरेदीदार यांना जास्तीत जास्त कशाप्रकारे सुविधा देता येतील यावर लक्ष ठेवून आहेत.