शिरूर एमआयडीसीला ठेकेदारीचे ग्रहण!

0

स्थानिकांच्या जमिनी गेल्या, रोजगारही मिळेना; कामगार संघटनांना दडपण्यासाठी गुन्हेगारांना पसंती

मंदार तकटे : शिक्रापूर
शिक्रापूर, रांजणगाव, सणसवाडी व कोरेगाव औद्योगिक वसाहतींच्या उभारणीसाठी शेतकरी आणि भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्यांना प्राधान्याने येथील विविध कारखान्यात नोकरी, लहान मोठ्या स्वरुपातील ठेक्यामधील कामे देणे बंधनकारक आहे. परंतु, अनेक उद्योगांनी स्थानिकांना रोजगार देण्याच्या अटींची पूर्तता केली नसल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. स्थानिकांना रोजगार देण्याची टक्केवारी पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा व राज्य प्रशासनाने संबंधित कंपन्यांच्या व्यवस्थापनाला दिल्या आहेत. परंतु, या सूचनांनाही येथील कंपन्यांनी धुडकावले आहे. अनेक कारखानदार कामगार संघटनांना दडपण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या ठेकेदारांना पसंती देत आहेत.

स्थानिकांना बाहेरचा रस्ता
सर्वच ठिकाणी स्थानिक शेतकर्‍यांच्या मुलांना विविध उद्योगात भरतीसाठी प्राधान्य देण्याचे धोरण आहे. या धोरणानुसार उद्योगांमध्ये तब्बल 80 टक्क्यांपर्यंत स्थानिकांची भरती करण्याची अट आहे. या अटीला अनेक कारखानदारांनी धुडकावून लावले आहे. किती उद्योगांनी स्थानिकांना रोजगार दिला याचा पाठपुरावा होत नसल्याने अनेकांचे फावले आहे. त्यामुळेच नोकर्‍या मागायला जाणार्‍या गरजू स्थानिकांना रोजगार देण्याऐवजी त्यांना बाहेरचा रास्ता दाखवला जात आहे. स्थानिक तरुण कंपन्यांमध्ये नोकरीला लागल्यानंतर दादागिरी करतात, असा खोटा निकष लावला जात आहे. त्यामुळे गरजू तरूण-तरूणी रोजगारापासून वंचित राहत आहेत.

कामगार आणि व्यवस्थापनामध्ये संघर्ष; जशी दादागिरी तसा ठेका
अनेक कंपन्यांमध्ये हिंदी भाषिक व्यवस्थापन असल्याने ज्या मराठी भाषिक स्थानिकांना रोजगार उपलब्ध आहेत त्यांना अशा व्यवस्थापनाकडून सापत्न वागणूक दिली जाते. विविध सुविधांपासून त्यांना वंचित ठेवले जात असल्याचाही आरोप कामगार करताना दिसतात. त्यातूनच कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात संघर्ष पाहावयास मिळत आहे. शिक्रापूर, रांजणगाव, सणसवाडी व कोरेगाव या औद्योगिक वसाहतीत परप्रांतीय कामगारांना प्राधान्याने रोजगार मिळत आहेत. स्थानिकांना मात्र बर्‍याचदा डावलण्यात येत आहे. या औद्योगिक वसाहतींमध्ये गुन्हेगारी क्षेत्रात दबदबा असलेल्या आणि भक्कम राजकीय पाठबळ असलेल्या ठेकेदाराची सध्या चलती आहे. कोट्यवधी रुपये मिळत असल्याने ठेकेदार आता उद्योजक म्हणून मिरवत आहेत. ज्याची दादागिरी जितकी मोठी तितक्या मोठ्या कंपन्यांमध्ये त्याचे ठेके असल्याचे चित्र आहे. कंत्राटी कामगार, भंगार माल उचलणे, कँटीन, माल वाहतूक करण्यासाठी मोठ्या वाहनांचा ठेका, कामगार वाहतूक करण्यासाठी बस, चारचाकी मोटारींचा ठेका मिळविला जातो. राजकीय दबदबा तसेच सत्ताकारणातून विनाकष्ट अर्थकारणाचा मार्ग शोधले जातात.