शिरूर । शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्ययार्डमध्ये गुरुवारी (दि.2) जनावरांचा बाजार भरला होता. या बाजारामध्ये पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील पशुपालक शेतकर्यांनी मोठी गर्दी केली होती. गेल्या महिन्यापासुन सुरू झालेल्या जनावर बाजारमध्ये शेतकर्यांनी गुरुवारी मोठ्या प्रमाणावर पशुधन विक्रीसाठी आणले होते. तसेच अनेक खरेदीदार शेतकर्यांनी गाय, बैल, म्हैस इत्यादींची खरेदी केली. सुमारे 200 ते 225 जनावरांची बाजारात आवक झालेली होती. तर विक्रीतून 40 ते 50 लाखांची उलाढाल झाली.
तरुणांचा कल दूध व्यवसायाकडे
शिरूर तालुका हा बागायती असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पशुधन आहे. दूध व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर तरूण वळू लागलेले आहेत. परंतु शिरूर व शेजारील तालुक्याजवळ कोठेही जनावरांचा बाजार नसल्यामुळे गाय, बैल, म्हशीच्या खरेदीसाठी अनेक शेतकर्यांना दूरच्या बाजारामध्ये जावे लागत असे. परंतु हा बाजार शिरूरमध्येच सुरू झाल्यामुळे शेतकर्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. जनावर बाजार शिरूर येथे सुरू झाल्यामुळे शेतकरी वर्ग अत्यंत आनंदी असून शिरूर परिसरातील शेतकर्यांनी बाजार समितीचे सर्व संचालक मंडळाचे आभार मानले.
चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील
जनावर बाजारामध्ये दिवसभरात बाजार समितीच्या कर्मचार्यांनी शेतकरी, व्यापारी यांच्यासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. या बाजारामध्ये बाजार समितीने पशुपालक शेतकरी, व्यापारी, खरेदीदार यांना आवश्यक त्या सर्व सुविधा दिलेल्या आहेत, असे सभापती शशिकांत दसगुडे यांनी सांगितले. उपसभापती विश्वासकाका ढमढेरे, सचिव दिलीपराव मैड, व सर्व संचालक मंडळ जनावर बाजार मध्ये शेतकरी, व्यापारी, खरेदीदार यांना जास्तीत जास्त कशा प्रकारे सुविधा देता येतील, यावर लक्ष ठेवून आहेत.
जनावरांचा चांगला भाव
शिरूर परिसरात अनेक दूध उत्पादक शेतकरी असून त्यांना या बाजारचा चांगला उपयोग होणार आहे. शेतकरी वर्गाचा अत्यंत ज्वलंतशील विषय हाताळल्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असून खर्चात बचत होणार आहे, असे अनेक शेतकर्यांनी सांगितले. तालुक्यातील अनेक व्यापार्यांनी गायी, म्हैस व बैल विक्रीसाठी आणलेले होते. शिरूर येथील जनावर बाजारमध्ये मोठ्या प्रमाणावर गिर्हाईक असल्यामुळे व चांगली किंमत मिळत असल्यामुळे व्यापारी देखील खुश आहेत.