शिरूर तालुक्यात भीषण पाणी टंचाई

0

परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने रब्बी पीक धोक्यात : शाश्‍वत पाणीपुरवठ्याची मागणी

विठ्ठल वळसे पाटील

सणसवाडी : शिरूर तालुक्यातील पश्‍चिम पट्ट्यातील कोरडवाहू भाग म्हणून पाबळ, केंदूर तसेच कान्हूर मसाई हे कांदा व नगदी पिके घेणारा भाग आहे. सध्या ऊस व भाजीपाल्याची पिके या भागात चांगल्या प्रकारे घेतली जात आहेत. परंतु या भागात शाश्‍वत पाणी पुरवठा योजना नसल्याने सिंचन क्षेत्र कमी आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. मात्र या वर्षी आक्टोबरपासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने रब्बी पिकाला मोठा फटका बसला आहे. पशुधन सांभाळणे शेतकरी वर्गाला अशक्य झाले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या भागाला टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. या खर्चाऐवजी पूरक व शाश्‍वत योजनेतून पाणी द्या, अशी मागणी आता शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.

लोकप्रतिनिधींना एकत्र येण्याची गरज

पाणीयोजना अस्तितवात येणे अत्यंत गरजेचे झाले आहे. एखादी उचलपाणी योजना राबवून ते पाणी थिटेवाडी बंधार्‍यात आणल्यास आठ महिने येथील नागरिक व शेतकरी दुष्काळाशी सामना करू शकणार आहे. या नव्या संकटाला तोंड देण्यासाठी राजकीय पक्षानिवेश सोडून या प्रश्‍नावर सर्व लोकप्रतिनिधींना एकत्र येऊन पूरक पर्याय काढावा लागणार आहे. सध्या राजकीय वातावरण तापलेले असताना स्थानिक पाण्याबाबत कोणीही ब्र काढण्यासही तयार नाही. निवडणुकीत होणार्‍या उधळपट्टीच्या निम्म्या खर्चात एखादी शाश्‍वत योजना तयार होऊ शकते, असा विचार सध्या जनमनात चर्चीला जात आहे. अन्यथा सर्वांनाच राजकीय नाराजीला तोंड द्यावे लागणार आहे, अशी लोक मानसिकता झाली आहे.

थिटेवाडी बंधारा पडला कोरडा

परतीच्या पावसाअभावी पाबळ, केंदूर व कान्हुरमेसाई परीसरातील गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. केंदूर येथील थिटेवाडी बंधारा कोरडा ठाक पडला आहे. तर विहिरी, तळी, विंधन विहिरींनी तळ गाठला आहे. भुजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. विंधन विहिरी घेऊन भूगर्भाची चाळण होऊ लागली आहे. 200 ते 400 फूटपर्यंत बोअर घेतल्या जाऊ लागल्या आहेत. अशा परिस्थितीत यापुढील किमान आठ ते दहा महिने शेतीची पिके हाती लागणे मुश्किल आहे. असे असताना किमान जनावरे जगवण्यासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी तातडीचे प्रयत्न होण्याची गरज आहे.

पाणीपुरवठा विभागाच्या बैठका

दीर्घकालीन पाणी योजनेऐवजी या भागाच्या चारही बाजुंनी वाहत असलेल्या कालव्याच्या माध्यमातून एखादी तातडीची व पूरक पाणी योजना अस्तित्वात आणण्याची मागणी या भागातून होत आहे. आता याबाबत पाणी पुरवठा विभागाच्या बैठक घेतल्या जात आहेत.
दहा वर्षांपूर्वी या परिसराला पाणी मिळण्यासाठी कळमोडी धरणातून वेळ नदीत पाणी सोडले जात होते. या माध्यमातून या भागातील पाणीप्रश्‍न सोडवण्याचे प्रयत्न झाले. मात्र त्या आशा संपुष्टात आल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीत ही योजना मार्गी लावण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. मात्र ते असफल ठरले.

शेतकरी हैराण

आठ महिने आधीपासून जाणवू लागलेल्या दुष्काळी परिस्थितीने शेतकरी हैराण झाला आहे. या भागाला चास कमान डावा व डिंभे धरण कालव्याचा लाभ मिळत नाही. ही गावे उंचवट्यावर असल्याने कायम दुष्काळी परिस्थितीचा सामना करत आली आहेत. याभागात आता टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी मागणी सध्या आठ गावांनी केली आहे. तसेच शिक्रापूर, सणसवाडी परिसरात उद्योग नगरी विकसीत झाल्याने याही भागाला आतापासून पाणी प्रश्‍न भेडसावत आहे. उद्योग व शेतीसाठी पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या परीस्थितीत आठ ते दहा महिने कसे काढायचे, हा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर उभा राहीला आहे.

चार्‍याचा तुटवडा

केंदूर भागातील थिटेवाडी बंधार्‍याचे पाणी विविध पाणी योजनांमार्फत व काही प्रमाणात शेतीला जेमतेम आठ महिने पुरत असल्याने दरवर्षी चार महिने दुष्काळाला सामोरे जावे लागते. गेली पंधरा वर्षे हीच वस्तुस्थिती आहे. मात्र याच वस्तुस्थितीवर कायमस्वरूपी उपाय होत नसल्याने दुष्काळ परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर पशुधन आहे, दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांचे संसार त्यावर अवलंबून आहेत. खरीप हंगाम ही हाती आला नाही त्यात रब्बीत पाऊसच नाही. त्यामुळे चार्‍याचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. यातून बाहेर पडण्यासाठी या भागांना शाश्‍वत योजनांची गरज आहे.