शिरूर तालुक्यात संपूर्ण दारूबंदीसाठी पाचंगे यांचे उपोषण

0

शिरूर । शिरूर तालुक्यात संपूर्ण दारूबंदी करण्याच्या मागणीसाठी तहसिल कार्यालयासमोर आजपासुन क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.शिरूर तालुक्यातील 93 ग्रामपंचायतींपैकी 93 ग्रामसभांचे दारूबंदीसाठी ठराव झाले असुन शिरुर तालुक्यात दारुबंदी जाहीर व्हावी, दोनशे पेक्षा जास्त हातभट्टीविक्री ठिकाणांवर कारवाई करावी. दररोज हजारो लिटर बनावट दारूची राजरोस विक्री होते यांवर कारवाई व्हावी. शिरूर पंचायत समितीने दारूबंदी ठराव पास केला आहे यावर अंमलबजावणी करावी. नागरिकांना अवैध दारूविक्री संदर्भात हेल्पलाईन उपलब्ध करावी. तहसिलदारांनी आदेश देउनही कार्यवाही न करणार्‍यांवर कारवाई कधी करणार, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारपासून पाचंगे शिरूर तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहे.

तहसिलदार रणजीत भोसले यांनी उपोषणकर्ते पाचंगे यांच्याबरोबर याबाबत चर्चा करून तालुक्यात अवैद्य दारू विक्री होत असल्यास संपूर्ण दारूबंदी संदर्भात कारवाई करण्याचे आश्‍वासन देऊन उपोषण थांबवण्याची विनंती यावेळी पाचंगे यांना केली. यावेळी मंगेश कावळे, युसूफ इनामदार, धनंजय गायकवाड, नम्रता गवारे, गायकवाड, संतोष कदम,अशोक भुजबळ, सुशांत कुटे आदी उपस्थित होते.