शिरूर : शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात बिबट्याची दहशत वाढली आहे. पाळीव प्राण्यांबरोबरच नागरीकांवरही हल्ले होऊ लागले आहेत. वन विभागाने हिंसक बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी घोडगंगा कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांनी केले. घोडनदी व कुकडी नदीच्या पाणी व्यवस्थापनामुळे या परिसरात उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामध्ये बिबट्यांचे वास्तव्य वाढले. सध्या गळीत हंगाम सुरू आहे. सगळीकडे उसाच्या तोडण्या सुरू असल्याने बिबट्यांचे वास्तव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे हे बिबटे मानवी वस्तीकडे वळले आहेत. माळवाडी येथे विलास हनुमंत भाकरे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला होता. विठ्ठल साबळे यांची शेळी तर अनिल भाईक यांची कालवड बिबट्याने ठार केली. असे असूनही वन विभागाने यावर कोणत्याही उपाययोजना अजूनपर्यंत केलेल्या नाहीत.