शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारीच करतात घंटागाडीतील कचर्‍याचे वर्गीकरण

0

स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत शहरात स्वच्छता मोहीम : पोरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

शिरूर : शिरूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदाचा पदभार अ‍ॅलिस पोरे यांनी स्विकारल्यानंतर नगगरपरिषदेच्या कारभारामध्ये सुसूत्रता आली आहे. सध्या शहरात स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत युध्द पातळीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असल्याने शहर चकाचक झाल्याचे पाहावयास मिळत आहे. नागरीकांनी घंटागाडीमध्ये दिलेल्या कचर्‍याचे वर्गीकरण स्वतः मुख्याधिकारी पोरे यांनी करून एक आदर्श ठेवल्याने परिसरात त्यांच्या कामाचे कौतुक होताना दिसून येत आहे.

नागरिकांच्या गैरसोयी दूर करण्यावर भर

अधिकारी येतात जातात परंतु आपल्या कर्तव्याशी प्रमाणिक राहून चक्क कचर्‍यात उतरून हाताने कचर्‍याचे वर्गीकरण करून समाजासमोर एक आगळा वेगळा आदर्श निर्माण करणारे अधिकारी दुर्मिळ पाहायला मिळतात. शिरूर नगरपरिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी त्यातीलच एक असून त्यांनी नगरपरिषदेचा पदभार स्विकारल्यापासून नागरिकांच्या गैरसोयी दूर करण्यात भर दिला आहे. कामानिमित्त येणार्‍या नागरीकांना ताटकळत उभे राहावे लागू नये म्हणून आसन व्यवस्था, कर्मचार्‍यांना शिस्त लावण्यासाठी बायोमॅट्रीक मशीन बसवून घेतली. त्याचबरोबर स्वतः मुख्याधिकारी कार्यालयात वेळेत येत असल्याने नागरीकांची कामे वेळेत मार्गी लागत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

ओला-सुका कचर्‍याचे वर्गीकरण करण्याचे आवाहन

ओला-सुका कचर्‍याचे वर्गीकरण करून देण्याबाबत शहरवासियांना मुख्याधिकार्‍यांनी आवाहन केले आहे. तरीही काहीजण याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे कर्मचार्‍यांची तारांबळ उडते. याकडे लक्ष केंद्रीत करत मुख्याधिकारी स्वतः कर्मचार्‍यांसह कचर्‍यात उतरून ओलासुका कचर्‍याचे वर्गीकरण करतात. हे दृश्य अनेकांनी पाहिल्याने आता नागरिकच एकमेकांना कचर्‍याचे वर्गीकरण करून देण्याबाबत जनजागृती करताना दिसून येत आहे. कचर्‍याचे वर्गीकरण करून घंटागाडीकडे देऊन नगरपरिषदेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

शहर झाले चकाचक

सध्या शिरूर नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये सहभाग घेतला असून मुख्याधिकारी पोरे यांनी स्वतः यावर लक्ष केंद्रीत केले आहे. दिवसातून दोनदा स्वच्छता केली जात असल्याने शहर चकाचक झाले आहे. सकाळी मुख्याधिकारी स्वत: शहराची पाहणी करून नागरीकांच्या समस्या जाणून घेतात. घंटागाडीत कचरा देताना ओला व सुका कचर्‍याचे वर्गीकरण करून देण्याचे आवाहन त्यांनी केले असून वेळेप्रसंगी त्या स्वतः कचर्‍यात उतरून ओला व सुका कचर्‍याचे वर्गीकरण करतात. हुडको वसाहतीजवळ असणार्‍या कचरा डेपोला मागे अचानक आग लागली होती. त्यावेळीही त्यांनी जीवाची पर्वा न करता कचरा डेपोवर जाऊन कर्मचार्‍यांबरोभर आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले.