शिरूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जलाशय बांधा

0

शिरुर । शिरुर शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेता शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सरदवाडी ते गोलेगाव दरम्यान जाणार्‍या डिंभे धरणाच्या उजव्या कालवा परिसरात जलाशय करावा, अशी मागणी विविध सामाजिक संस्था आणि राजकीय संघटनाच्या वतीने करण्यात आली आहे. हे निवेदन पुणे जिल्हाधिकारी, खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार बाबुराव पाचर्णे यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रविंद्र धनक, किसान क्रांतीचे राज्याचे समन्वयक नितीन थोरात, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, बापू सानप, हाफिजभाई खान, युनुस सय्यद, अनिल बांडे, प्रिया रुणवाल आदींच्या सह्या आहेत.

शहरवासीयांना दुर्गंधीयुक्त पाणी
शिरूर शहरवासियांना दुर्गंधीयुक्त पाणी मिळत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. शिरूर शहराला सध्या घोडनदीच्या पात्रातून पाणीपुरवठा होतो. नदीपात्रात धरणापासून ते शिरूर शहरापर्यंत असणार्‍या गावांचे सांडपाणी याच नदीपात्रात सोडल्याने आणि अन्य कारणाने शिरूर शहरापर्यंत येणारे पाणी दूषीत होत असते. याबाबत विविध आंदोलनेही झालेली आहेत. शहराचा वेगाने विकास होत असून तीन तालुक्याची शिरूर ही मुख्य बाजारपेठ आहे. याखेरीज शहरालगत रांजणगाव पंचतारांकीत औद्योगिक वसाहत आहे. याकारणाने शहराची लोकसंख्या वाढत आहे. अनेक नागरिक पिण्याचा पाण्यासाठी पाण्याचे जार विकत घेतात, असे निवेदनात म्हटले आहे.

…तर मिळेल स्वच्छ पाणी
घोडनदी पात्रात आंबेगाव तालुक्यात डिंभे धरण बांधण्यात आलेले आहे. या डिंभे धरणाचा उजवा कालवा शिरूर तालुक्यातील काही गावांमधून जातो. तो कालवा गोलेगाव येथे संपतो. सध्या या कालव्याचे पाणी तालुक्यातील कर्डिलवाडी या गावापर्यंत येत आहे. गोलेगावपर्यंतचे काम पूर्ण झालेले नाही. सरदवाडी ते गोलेगाव या दरम्यान जाणार्‍या कालवाच्या मार्गात जलाशय निर्माण केला तर या कालवाद्वारे धरणातील पाणी थेट या जलाशयात नेता येईल. तसेच शहराला स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळेल. याकरीता सरदवाडी ते गोलेगाव दरम्यान जाणार्‍या कालवालगतचा क्षेत्राचे सर्वेक्षण परीक्षण करून जलाशयासाठी लागणार्‍या जागेची निवड करावी. सध्या शहराला हत्तीडोह परिसरातून पाणीपुरवठा केला जातो. त्यांची साठवण क्षमता भविष्यात अपुरी पडणार असून त्यामुळे साठवण क्षमता आणि सुरक्षितता वाढविण्याचा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ही निवेदनात करण्यात आली आहे.