शिरूर । सर्वसामान्यांना केंद्र बिंदू मानून केंद्र व राज्य सरकारच्यावतीने राबविण्यात येणार्या अनेक लोकहिताच्या योजनांचा लाभ नागरीकांना मिळवून देण्यासाठी व शिरूर-हवेली मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठरवून त्यासाठी जास्तीत जास्त निधी मतदार संघात आण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन शिरूर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी केले.
विकास कामे
शिरूर-निमोणे-निर्वी गावात विकास कामे करणे व दोन वर्षांसाठी त्याची देखभाल करण्याच्या कामाचे आमदार पाचर्णे यांच्या हस्ते गोलेगाव येथे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी पाचर्णे बोलत होते. भाजपचे तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला. त्यामुळे नागरीकांमधून समाधान व्यक्त होत होते. पंचायत समितीचे सदस्य आबासाहेब सरोदे, नामदेव घावटे, राजेश लांडे, राजेंद्र गदादे, संतोष मोरे, श्रीकांत सातपुते, अरूण घावटे, अनुपमा वाखारे, सुनिल भोगावडे, दिलीप हिंगे, गोरक्ष काळे, विशाल घायतडक, वर्षा काळे आदींसह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
लोकहिताची कामे
शिरूर ते निर्वी रस्त्यात सुधारणा करण्याचे आश्वासन आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दिले होते. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करून दिलेला शब्द पाळला आहे. शेतकरी व सर्वसामान्य माणूस केंद्र बिंदू मानून सरकारने अनेक हिताच्या योजना आणल्या असून त्यात उज्ज्वल गॅस योजनेमुळे गरीबांच्या घरा-घरात मोफत गॅस देण्याचे चांगले काम आणि असे अनेक लोकहिताची कामे सरकार करत असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके यांनी यावेळी सांगितले.
निधी उपलब्ध
राजकारणविरहीत भुमिकेतून विकासकामांना प्राधान्य देत असून शिरूर हवेलीतील विकास कामांना मोठी निधी उपलब्ध करून दिला असल्याने अनेक विकास कामांना चालना मिळाली आहे. यापुढे देखील विकास कामांसाठी निधी आणण्यावर भर देण्यात येणार आहे. शिरूर ते निर्वी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग ठरणार असून या रस्त्यामुळे चांगली सुविधा मिळणार असल्याचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी पुढे सांगितले.