शिर्डी | येथील तीन दिवस चालणाऱ्या गुरूपौर्णिमा उत्सवाला शनिवारी साईबाबांच्या काकड आरतीने अतिशय उत्साहात सुरूवात झाली. साईबाबांच्या फोटो व पादुकांची मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली होती. उत्सवासाठी लाखो भाविक शिर्डीत दाखल होणार आहेत. साईभक्तांना बाबांच्या समाधीचे दर्शन मिळावे यासाठी रविवारी, उत्सवाच्या मुख्य दिवशी साईमंदिर रात्रभर उघडे राहणार आहे. या दिवशी शेजारती व जुलै रोजीची काकड आरती होणार नाही.
साईबाबांवर श्रध्दा असणारे असंख्य भाविक दरवर्षी गुरुपौर्णिमेला शिर्डीला येवून समाधीचे दर्शन घेतात व या उत्सवास हजेरी लावतात. भक्ताच्या भोजनाची, निवासाची आणि दर्शनाची व्यवस्था साईमंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे, असे संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी केले आहे. उत्सव काळात तीन दिवस श्री साई सत्यव्रत(सत्यनारायण), अभिषेक पूजा व वाहनांची पूजा गर्दीचा अंदाज घेवून चालू किंवा बंद ठेवण्यात येणार आहे. श्रींना अर्पण केलेली वस्त्रे, वस्तु वगैरेंची जाहीर लिलावाने प्रसाद रुपाने विक्री करण्यात येणार आहे.
२ किलो सोन्याच्या पादुका
उत्सवाच्या पहिल्या दिवशी आग्रा येथील अजय आणि संध्या गुप्ता या दाम्पत्याने द्वारकामाई मंदिरात बसविण्यासाठी २ किलो सोन्याच्या पादुका साईचरणी दान केल्या. यापूर्वीही या दाम्पत्याने द्वारकामाई मंदिरात ७० किलो वजनाचे चांदीचे मखर दान केले होते.
गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम
सकाळी 4.30 वाजता काकड आरती, 5.00 अखंड पारायणसमाप्ती, फोटो व पोथीची मिरवणूक, 5.20 मंगलस्नान व दर्शन, 6.00 पाद्यपुजा, दुपारी 12.30 माध्यान्ह आरती, सायंकाळी 4.00 ते 6.00 कीर्तन, सायंकाळी 7.00 धुपारती, रात्रौ 9.15 रथाची गावातून मिरवणूक