शिर्डीत भक्तांच्या चालण्याने होणार वीजनिर्मिती

0

पुणे/नगर : शिर्डी हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असे धार्मिक स्थळ आहे. त्यामुळे या ठिकाणी वर्षाचे बारा महिने भक्तांची गर्दी दिसून येते. त्यामुळे आता शिर्डी साई मंदिरात याच साईभक्तांच्या चालण्याने वीजनिर्मीती होणार आणि मंदिर उजळणार आहे. यामागे कोणताही दैवी चमत्कार नाही तर विज्ञान आहे. साईबाबा संस्थानने एका खासगी कंपनीसह फूट एनर्जी (चालण्याने तयार होणारी ऊर्जा) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत भक्तांच्या मार्गात अशी उपकरणे लावली जातील ज्यावर दाब पडल्यास वीजनिर्मिती होईल. देशात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग होत आहे.

200 बल्ब, 50 पंखे चालू शकतील या वीजनिर्मितीतून
संस्थानाला आशा आहे की या पद्धतीने जवळपास 200 बल्ब आणि 50 पंखे सुरू होण्याइतकी वीजनिर्मिती होऊ शकेल. याशिवाय येथे तयार होणार्‍या कचर्‍यापासूनही गॅस आणि वीज निर्मिती होऊ शकेल. शिर्डी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे म्हणाले की, भक्तांच्या मार्गावर 200 पॅडल लावले जातील. लोक जसजसे यावर चालत जातील तसतसे हे पॅडल दाबले जातील आणि यातून वीजनिर्मिती होईल. त्यांनी सांगितल्यानुसार यातील एका पॅडलची किंमत एक लाख रुपये आहे. परंतु संस्थान यासाठी कुठलाही खर्च करणार नाही. ज्या कंपनीशी करार झाला आहे ती बीओटी तत्त्वावर काम करणार आहे. हावरे म्हणाले की, दररोज 50 हजारांहून जास्त भक्त साईदर्शनासाठी शिर्डीत येतात. म्हणून रांगेत चालणार्‍या भक्तांद्वारे वीजनिर्मितीची प्रक्रिया वैशिष्ट्यपूर्ण आहे.

दोन महिन्यांत सुरू होणार चाचणी
पुढच्या दोन महिन्यांत याची चाचणी सुरू होईल. या प्रोजेक्टमधून तयार झालेल्या विजेचा वापर रांगेतील भक्तांसाठीच पंखे आणि प्रकाशासाठी करण्यात येईल. याशिवाय शिर्डीत रोज तयार होणाऱया 20 टन कचर्‍याचा वापरही गॅस आणि वीजनिर्मितीसाठी केला जाईल. हावरे म्हणाले, हा एक असा प्रकल्प असेल ज्याची नक्कल राज्यातील सर्व मनपा आपल्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी करतील.