शिर्डी-महाराष्ट्र राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांच्या ‘ई-गृहप्रवेश’ कार्यक्रमाचे शिर्डी येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहे. दरम्यान या कार्यक्रमासाठी शासनातर्फे करण्यात आलेल्या खर्चाची आकडेवारी समोर आली आहे. या एका कार्यक्रमासाठी तब्बल २ कोटींच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.
एका कार्यक्रमाच्या खर्चासाठी शासन दोन कोटींचा खर्च करणार असल्याने विरोधी पक्षांकडून सरकारवर लक्ष केले जात आहे. राज्यातील आर्थिक परिस्थिती बिघडली असतांना सरकारला अशा प्रकारे शासकीय निधीची उधळण करत असल्याची टीका होत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका करत मोदी लाट ओसरली असल्याने पैसा खर्च करून मोदींच्या कार्यक्रमाला गर्दी गोळा करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचे सांगितले.
आता @narendramodi यांची लाट ओसरली म्हणून गर्दी जमणार नाही या भीतीने गर्दी जमवण्यासाठी सरकार अधिकाऱ्यांना लेखी आदेश देत आहे. मोदींना खूष करण्यासाठी गर्दी जमवण्यात सामान्य जनतेच्या घामाचे कर रूपी जमा केलेले करोडो रुपयांचा चुराडा सरकार करत आहे. जनताच आता सरकारचा हिशेब करणार आहे.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 16, 2018
या कार्यक्रमाला ५ जिल्ह्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची उपस्थिती असणार आहे. २० हजार घरकुल योजनेचे लाभार्थी जोडप्यासह या कार्यक्रमाला येणार असल्याने एकूण ४० हजार लाभार्थी या कार्यक्रमाला असणार आहे. त्यामुळे दोन कोटींच्या निधीची तरतूद केल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे.