ठाणे । ठाणे महापालिकेच्या माध्यमातून दिवा- शिळ – देसाई, दहिसर तसेच 14 गाव विभागांना मध्यवर्ती पडणारे शिळ अग्नीशमन केंद्राचे भूमिपूजन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. आमदार सुभाष भोईर यांनी या अग्नीशमन केंद्रासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. येत्या वर्षभरात अत्याधुनिक अग्नीशमन केंद्र उभे राहणार आहे. यावेळी आमदार सुभाष भोईर, आमदार रवींद्र फाटक, उप महापौर रमाकांत मढवी, मुख्य अग्नीशमन अधिकारी काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे उपस्थित होते. शिळ येथील अग्नीशमन केंद्र 35 ु 18 मीटर क्षेत्रफळामध्ये उभे असून दुमजली इमारत बांधण्यात येणार आहे. तसेच चार अग्नीशमनच्या अत्याधुनिक गाड्या ठेवण्यात येणार आहेत.
या भूमिपूजन प्रसंगी बोलताना एकनाथ शिंदे यांनी नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी ठाणे महापालिकेचे शिळ अग्नीशमन केंद्र उपयुक्त ठरेल असा आशावाद व्यक्त केला तसेच एनडीआरएफच्या धर्तीवर ठाणे महापालिका प्रथमच टीडीआरएफ उभे करण्यात येणार असून राज्यामध्ये हा प्रथम प्रयोग करण्यात येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सदर भूमिपूजन प्रसंगी स्थानिक नगरसेविका साजिया अन्सारी, शेख हाजरा कामरूल, जमीला नासिर खान, आजमी शाह आलम, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, पंचायत समिती सदस्य भरत भोईर, उप जिल्हाप्रमुख भरत भोईर, शाखाप्रमुख वैकुंठ म्हात्रे, शाम काठे, वासुदेव पाटील, सुनील अलिमकर, दत्तू मामा, विश्वनाथ पाटील, मधुकर पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी उपस्थित होते.