शिवकालिन युद्धकलेचा थरार

0

जळगाव । गणपती विसर्जनाची मिरवणूक जळगावात दरवर्षी जल्लोशात काढली जाते. पण यंदाच्या जल्लोशाला कोल्हापुरी मर्दाना बाज लाभणार आहे. कोल्हापुरातील जगप्रसिद्ध सुरज ढोली यांचे मर्दानी खेळ पथक यंदाच्या मिरवणुकीत शिवकालिन युद्धकलेची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करणार आहे. बालाजी पेठ, (रिधुरवाडा) दधिची चौक येथील महाराणा प्रताप मित्र मंडळाने जळगावकर गणेशभक्तांसाठी खास ही सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याची माहिती मंडळाचे प्रमुख सल्लागार तसेच नगरसेवक कैलास सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तलवारबाजी, काठी, पट्टा, बाणा, बरची, विटा, जांबिया, फरिगदगा, कट्यार, दांडपट्टा यासह युद्धकलेतील छत्रपती शिवरायांच्या वारशाचे दर्शन ढोलीचे दर्शन यंदा कोल्हापुरी पथकाकडून होणार आहे.

अनेक पुरस्कार प्राप्त
दांडपट्ट्याने एका मिनिटात 84 लिंबू कापणे, डोळ्याला पट्टी बांधून चौघांच्या डोक्यावरील नारळ फोडणे आदी अनेक थरारक प्रदर्शनांबद्दल ढोली यांची संस्था शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंचला ’शाब्बास इंडिया’ या टॅलेंट हंट शोकडून ‘प्राइड ऑफ नॅशन’ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. जागतिक ’मार्शल आर्ट’ स्पर्धेतही संस्थेने अनेक पुरस्कार प्राप्त
केलेले आहेत.

वंदे मातरम स्टिकर भेट
महाराणा प्रताप मित्र मंडळातर्फे यंदा श्री. स्वामी समर्थ महाराजांची ‘आरास’ सादर केली गेली होती. भाविकांचा दर्शनासाठी प्रचंड प्रतिसाद लाभला. दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना ‘वंदे मातरम’ लिहिलेले स्टीकर आपल्या वाहनावर अथवा घरात लावण्यासाठी प्रसाद रुपात देण्याचा उपक्रम श्री. स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे राबवण्यात आला. स्वदेशी मालाला प्रोत्साहन व चिनी मालावर बहिष्काराचे संदेशही फलकस्वरूपातून भाविकांना देण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष सुरेश सोनवणे, उपाध्यक्ष बाळू नांद्रे, सचिव संदीप मंडोरा, दिलिप सिखवाल, किशोर मंडोरा, सोमनाथ व्यास, चिंतामण जैतकर, दिनेश तिवारी, नितिन शर्मा, प्रदीप भावसार, किशोर शिंपी, सागर सोनवणे, राहुल कोळी यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले.