चोरट्यांचा धुमाकूळ ; पॅन्ट घरापासून काही अंतरावरील मैदानात सापडल्या ; पाकिटासोबत हॉलटिकिट लांबविल्याने विद्यार्थी परिक्षेला मुकला
जळगाव – लाईट गुल झाल्याने हवेसाठी दरवाजा उघडा ठेवणे तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. उघड्या दरवाजातून प्रवेश करत चोरट्याने खोलीतील विद्यार्थ्यांसह फार्मासिस्ट तरुणांचे एकूण 40 ते 45 हजाराचे चार मोबाईल लंपास केल्याची घटना सोमवारी रात्री शिवकॉलनीत घडली. विशेष म्हणजे चोरट्याने निघतांना तीन चार तरुणांचे टांगलेल्या पॅन्टही सोबत त्यामधील एकूण 5 हजाराची रोकड लांबविली. सकाळी खोलीपासून काही अंतरावर मोकळ्या मैदानात पॅन्ट मिळून आल्या.
शिवकॉलनी येथे मातोश्री गट नं 55, प्लॉट नं 27/1 हे चंद्रशेखर भांडारकर यांच्या मालकीचे आहे. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी त्या खोल्या भाडे करारावर उपलब्ध करुन दिल्या आहे. खोल्यांमध्ये शिक्षण घेत असलेले राजेंद्र विलास देशमूख, रा. पहूरपेठ जामनेर, सागर संतोष पाटील रा. पहूर या विद्यार्थ्यांसह फार्मासिस्ट म्हणून नोकरी करत असलेले राजेश सुभाष शिंदे रा.रावेर, शुभम संजय पांडे रा. शेंदुर्णी, रितेश दसरे रा. अजिंठा, आकाश मराठे रा. चोपडा हे तरुण भाडे करारावर वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहतात.
फोन लावण्यासाठी कुणाकडे मोबाईल नाही
लाईट ये-जा करत असल्याने तरुणांनी मुख्य दरवाजा बंद केला. उकाडा असल्याने हवा यावी म्हणून काही तरुणांनी मागील बाजूचा दरवाजा उघडा ठेवला. रात्री सर्व झोपले. सर्वांनी आपआपले मोबाईल टेबल, खुर्ची तसेच पलंगावर ठेवले होते. सकाळी सर्वप्रथम शुभम उठला. त्याचा मोबाईल न दिसल्याने त्या राजेश शिंदे यास त्याला मोबाईल मागितला. त्याचा मोबाईल सापडला नाही. यानंतर प्रत्येकाने आपआपला फोन शोधला मात्र सर्वांचे मोबाईल चोरी झाल्याचे लक्षात आले. फोन लावावा म्हणून कुणाकडेच मोबाईल शिल्लक नव्हता. नेमका राजेश शिंदे यांचा औरंगाबादचा वकील मित्र अॅड. भरत डोईफोडे जळगाव न्यायालयात काम असल्याने जळगावला आला होता. तो रात्री खोलीवरच थांबला, त्यांचाही मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. अशा प्रमाणे चोरट्यांनी राजेश शिंदे याचा 22 हजाराचा, राजेंद्र देशमुख चा 8500, शुभम पांडे याचा 18 हजार, अॅड. डोईफोडे यांचा 5 हजाराचा असे एकूण 40 ते 45 हजाराचे मोबाईल लांबविले.
हॉलटिकिट लांबविल्याने पहिल्याच पेपरला मुकला
चोरटा केवळ मोबाईलवरच थांबला नाही. त्याने प्रत्येकाच्या खोलीतील टांगलेल्या पॅन्टही सोबत नेल्या. खोली पासून काही अंतरावर त्याने पॅन्टमधील पैसे तसेच पाकिट काढून घेत पॅन्ट जागेवरच फेकून पोबारा केला. यात राजेंद्र देशमुख याचे पॅन्टमधील 200 रुपये, राजेश शिंदे याचे 2000 रुपये, शुभम पांडे याचे 400 रुपये व सागर पाटील याचे 1200 रुपये अशी पाच हजार रुपयापर्यंतची रोकडवर डल्ला मारला. सकाळी परिसरात शोधाशोध केली असता, एका नागरिकाने माहिती दिल्यानंतर खोली पासून काही अंतरावर असलेल्या मोकळ्या मैदानात सर्वांच्या पॅन्ट सापडून आल्या. यात राजेंद्र देशमुख हा बांभोरी अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. तो दोन दिवसांपूर्वीच या तरुणांमध्ये राहण्यासाठी आला. त्याचा मंगळवारी पहिलाच पेपर होता. परिक्षेसाठीचे हॉलटिकिट पाकिटात ठेवलेले असल्याने हॉलटिकिट अभावी त्याला परिक्षेला मुकावे लागले. सर्व तरुणांनी एकत्र येवून मंगळवारी दुपारी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले व संबंधित प्रकाराबाबत तक्रार दिली.
शिवकॉलनीतील चोर्यांचे सत्र थांबेना
तरुणांनी दिलेल्या माहितीनुसार शिवकॉलनीत गेल्या चार महिन्यांपासून चोर्यांचे सत्र सुरु आहे. विशेष म्हणजे तरुण राहत असलेल्या बाजूच्या घरात एका पोलीस कॉन्स्टेबल वास्तव्यास आहे. त्या पोलीस कर्मचार्याचेही घरातून मोबाईल व पाकिट लंपास झाले होते. सोमवारी शिव कॉलनीत घरात झोपलेल्या संदीप दगडू सोनवणे यांच्या उघड्या घरातून चोरट्यांनी संदीप, त्यांचे वडील यांची पॅँट व पत्नीची पर्स लांबविली. या पर्समध्ये पाच हजार रुपये, वडीलांच्या खिशात साडे चार हजार रुपये होते. ही घटना ताजी असतानाच चोरट्यांनी तरुणांचे मोबाईल रोकड लांबवून पोलिसांना आव्हान दिले आहे.