शिवकॉलनी उड्डाण पुलावर ग्रंथपालास ट्रॅव्हल्सने चिरडले

0

जळगाव। शिवकॉलनी उड्डाणपुलावर मंगळवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास विद्यापीठाकडून शहराकडे येत असलेल्या एैनपूर महाविद्यालयातील ग्रंथपालास मागून धडक देत चिरडल्याची घटना घडली. राहूल भिकाजी खंडोर (वय-30) असे मयताचे नाव आहे.

वाघ नगरातील रहिवासी राहूल भिकाजी खंडारे हे पत्नी पुनम व मुलगी साक्षी यांच्या सोबत राहत होते. तर रावेर तालुक्यातील ऐैनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात ते ग्रंथपाल म्हणून कार्यरत होते. मंगळवारी सायंकाळी राहूल हे त्यांची मोटारसायकल क्रं. एमएच.19.बीसी.8945 ने विद्यापीठाकडून शहराकडे येत होते. दरम्यान, शिवकॉलनी उड्डाणपुलाजवळून जात असतांना मागुन येणार्‍या शिव शंभु यात्रा कंपनीची ट्रॅव्हल्स (क्रं. एमएच.19.वाय.5091) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक देत पन्नास मिटरपर्यंत दुचाकीसह राहुल यांना फरफटत नेले. यात राहूल यांचा जागीच मृत्यू झाला. रामानंदनगर पोलिसांना महामार्गावर अपघात झाल्याची माहिती मिळातच त्यांनी घटनास्थळ गाठत राहूल खंडारे यांना रूग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविले. यानंतर वाहतुक सुरळीत केली. राहूल यांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मित्रमंडळी व नातेवाईकांना मिळातच त्यांनी जिल्हा सामान्य रूग्णालय गाठत आक्रोश केला.