जळगाव । भरधाव वेगात येणार्या कारने कट मारल्याने राष्ट्रीय महामार्गावरील शिवकॉलनी उड्डाणपुलावरून रिक्षा कोसळल्याची घटना सोमवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर रिक्षाचालक देखील गंभीर जखमी आहे. सुदैवाने रिक्षात प्रवासी नसल्याने जीवीत हानी टळली. पिंप्राळा येथील रिक्षाचालक सागर कोळी हा सोमवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास स्वत:च्या रिक्षाने (एमएच.19.जे.6893) राष्ट्रीय महामार्गावरील शिवकॉलनी उड्डाणपुलावरून घराकडे जात होता.
कारने कट मारल्याने घडली घटना
दरम्यान, पुलावर समोरून येणार्या भरधाव कारने रिक्षाला कट मारला. यात सागरचे रिक्षावरील नियत्रंण सुटला आणि रिक्षा चक्क शिवकॉलनी पुलावरून खाली कोसळी. यात सागर हा गंभीर जखमी झाला असून पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. तर रिक्षाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेत सागर यास जिल्हा रूग्णालयात पाठविले व पोलिसात माहिती दिली. या अपघातामुळे पंधरा ते वीस मिनिटं महामार्गावर वाहतुक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी वाहतुक पोलिस दाखल झाल्यावर वाहतुक सुरळीत करण्यात आली होती. जखमी सागर यास यानंतर खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले असल्याचे समजते.