शिवछत्रपतींचा कालखंड प्रथमच सुवर्ण पटलावर

0

‘धातूचित्र शिल्पकला’ प्रदर्शनीला उदंड प्रतिसाद

पुणे: छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त दुर्ग फौंडेशन तर्फे बालगंधर्व कलादालन येथे धातूचित्र शिल्पकला’ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या अभूतपर्व कलेचा अविस्मरणीय अनुभव पुणेकरांनी घेतला. प्रथमच शिवछत्रपतींचा कालखंड धातूचित्रांच्या माध्यमातून सुवर्ण पटलावर साकारण्याचा यशस्वी प्रयत्न संजय राऊळ या कलाकाराने केला.

छत्रपती शिवरायांच्या जन्मापासून तर महानिर्वाणापर्यंतच्या ऐतिहासिक घटनांचा कलाविष्कार धातूचित्रांतून उलगडला. या कलेचे वैशिष्ट्य म्हणजे देशपातळीवर प्रथमच शिवछत्रपतींच्या कालखंडातील प्रसंग कोरीव स्वरुपात साकारण्यात आले आहेत. ही चित्रे पितळ व तांबे या धातूंचा वापर करून बनविली आहेत. ही चित्रशिल्पे भरीव स्वरुपाची असून वजनास जड आहेत. ही धातू चित्रशिल्पे साकारण्यासाठी सुमारे तीन वर्षे लागली आहेत. या चित्रांतील बारकावे पाहण्यासाठी दुर्बिणीचा वापर करावा लागतो. गेली 15 वर्षे शिवरायांचे कार्य ते लोकांसमोर उभारण्याचा प्रयत्न करीत आहेत. आजवर त्यांनी अनेक प्रयत्न केले मात्र कर्जबाजारी होऊनही त्यांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नसल्याने पुण्यात हे अनोखे प्रदर्शन भरविले होते. या प्रदर्शनाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

कालांतराने जरी ही चित्रशिल्पे जमिनीत गाडली गेली, पाण्यात बुडाली अथवा आगीमध्ये जळाली तरी ती नष्ट होणारी नाहीत. तसेच पिढ्यान-पिढ्या अस्तित्वात राहू शकतील अशा स्वरुपाची आहेत.
– संजय राऊळ (धातूशिल्पकार)