पुणे : छत्रपती शिवाजी महाराज खर्या अर्थाने रयेतेचे राजे होते. त्यांनी उत्तम प्रशासक म्हणून जो आदर्श निर्माण केला आहे, त्या विचारांचा अवलंब करुन राज्यकारभार करणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले शिवनेरीवर (ता. जुन्नर) झालेल्या शिवजयंती कार्यक्रमात केले.
शिवजयंती निमित्त रविवारी शिवनेरी किल्ला शिवभक्तांच्या अलोट गर्दीने व शिवघोषाने दुमदुमून गेला होता. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, आमदार शरद सोनवणे, आमदार विनायक मेटे, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, तसेच शिवप्रेमी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, की शिवरायांच्या प्रेरणेने, स्फुर्तीने त्यांनी उत्तम प्रशासक म्हणून जो आदर्श निर्माण केला, त्या विचारांचाच अवलंब करुन राज्यकारभार लोकाभिमुख करण्यावर आम्ही भर देणार आहोत. शिवाजी महाराजांनी खर्या अर्थाने रयतेला स्वाभिमान शिकविला. राज्यकारभार कसा चालववावा याचा आदर्श महाराजांनी आदर्श घालून दिला.
खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, आ. सोनवणे यांचेही यावेळी भाषण झाले. क्रीडा संघटक प्रल्हाद सावंत यांचा क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पगडी बांधून व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
समारंभापूर्वी शिवजन्मस्थळाच्या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत महिलांनी शिवजन्माचा पारंपरिक पाळणा सादर केला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या ठाकरवाडी येथील प्राथमिक शाळेतील मुला-मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विविध तरुण मंडळांनी मर्दानी खेळांची प्रात्यिक्षिके सादर केली. त्यानंतर शिवकूंज येथील राजमाता जिजाऊ व बालशिवाजी यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखीतून सवाद्य मिरवणूकही काढण्यात आली.