नवी मुंबई । महाराष्ट्र शासन क्रीडा विभागाच्या वतीने प्रदान करण्यात येणारा मानाचा शिवछत्रपती पुरस्कार सन 2014-15 करिता जाहीर झालेली कबड्डीची सुवर्ण कन्या व नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे तसेच आंतरराष्ट्रीय किर्तीचे जलतरणपट्टू विराज प्रभू आणि आपल्या दर्जेदार खेळाने राष्ट्रीय पातळीवर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे खो-खो पट्टू मनोज पवार त्याचप्रमाणे सन 2015-16 कषरता जलतरण क्रीडा प्रकारामध्ये अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावरील पदके संपादन करणार्या जलतरणपट्टू ऋतुजा उदेशी आणि महानगरपालिका शाळेतील चार राष्ट्रीय खेळाडूंचा नवी मुंबई महानगरपालिका सर्वसाधारण सभेत महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे उपाध्यक्ष रमेश डोळे, शिवसेना पक्षप्रतोद व्दारकानाथ भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदके संपादन
या शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मानांकित खेळाडूंप्रमाणेच राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेत चौदा वर्षांखालील गटातील सुवर्णपदक विजेत्या मुलांच्या महाराष्ट्र संघात प्रतिनिधित्व करणारा नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय शाळा क्र.104 आंबेडकर नगर रबाळेचा विद्यार्थी कु. अभय सदानंद रत्नाकर तसेच याच स्पर्धेत मुलींच्या गटातील सुवर्णपदक विजेत्या महाराष्ट्र संघात प्रतिनिधित्व करणारी नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय शाळा क्र. 55 आंबेडकर नगर रबाळेची विद्यार्थिनी कु. मीना दत्तात्रय कांबळे यांना सन्मानीत करण्यात आले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत चौदा वर्षांखाली गटात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करीत नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 36, कोपरखैरणे गांवचा विद्यार्थी कु. जय मोरे यांने राष्ट्रीय स्तरावर रौप्यपदक तसेच नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.04 सी.बी.डी. बेलापूरचा विद्यार्थी कु. सकिब शेख यांने कांस्य पदक संपादन केले आहे. या चारही खेळाडूंचे नवी मुंबई महानगरपालिका महासभेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.