नवी दिल्ली: आज संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जात आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनातहे शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी महाराष्ट्र सदनात शिवजयंती साजरी होते. मात्र यंदा महाराष्ट्र सदनातील शिवजयंतीला गालबोट लागले आहे. महाराष्ट्र सदनातून जवानांना जेवणाच्या ताटावरुन उठविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी भारतीय लष्कराच्या गोरखा रेजिमेंटचे जवान महाराष्ट्र सदनात आले होते. सकाळपासून हे जवान महाराष्ट्र सदनात बँडच्या माध्यमातून छत्रपतींना मानवंदना देत होते. दुपारी जेवणाच्या वेळी हे जवान कॅन्टीनमध्ये गेले असताना सहाय्यक निवासी आयुक्त विजय कायरकर यांनी जवानांना जेवणाच्या ताटावरून उठवले. झी २४ तास या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.
गोरखा रेजिमेंटचे जवान कोणत्याही कार्यक्रमाला जात नाहीत, पहिल्यांदाच शिवजयंतीच्या निमित्ताने हे जवान महाराष्ट्र सदनात आले होते. या जवानांना कॅन्टीनमध्ये बोलवण्यात आले होते. त्यांना जेवणासाठी ताटे वाढून होती. मात्र त्याचवेळी महाराष्ट्र प्रशासनाचे अधिकारी विजय कायरकर यांनी तुम्हाला याठिकाणी जेवता येणार नाही, तुमची व्यवस्था अन्य ठिकाणी केली आहे असे सांगत त्यांना कॅन्टीनमधून बाहेर काढले यावरुन काहीवेळ तणाव निर्माण झाला. हा प्रकार धक्काबुक्कीपर्यंत गेला.