पुणे । कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम महापालिकेकडून फक्त पेठांमध्येच घेतले जातात. महापालिकेच्या कार्यक्षेत्रात फक्त पेठाच येतात, असे नाही तर उपनगरांचाही समावेश आहे. त्यामुळे शिवजयंतीनिमित्त महापालिकेकडून घेतले जाणारे विविध कार्यक्रम उपनगरांमध्ये आणि समाविष्ट गावांमध्येही घ्यावेत. तसेच महात्मा फुले यांनी पहिली शिवजयंती हिराबाग चौक येथे साजरी केली. त्यामुळे हिराबाग चौकाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन तेथेही पालिकेने व्यासपीठासह इतर व्यवस्था करावी, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतिनिमित्त महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महापालिका सभागृहात आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये शिवप्रेमींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवक आणि शिवजयंती मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावर टिळक म्हणाल्या, मिरवणूक मार्गावर महिलांसाठी वॉर्ड ऑफीसकडून स्वच्छतागृहांची व्यवस्था केली जाईल. शिक्षण अधिकार्यांशी चर्चा करून शाळांमध्ये विविध कार्यक्रम घेतले जातील. वॉर्ड ऑफीसच्या माध्यमातून समाविष्ट गावांमध्ये आणि उपनगरात कार्यक्रम घेतले जातील. न्यायालयाचे निर्बंध असले तरी शिवजयंती भव्यदिव्य करण्यासाठी ज्या ठिकाणी पालिकेला खर्च करता येणार नाही, अशा ठिकाणी नगरसेवकांकडून पैसे खर्च केले जातील.
महापालिकेतर्फे शिवजयंतीनिमित्त घेण्यात येणार्या कार्यक्रमांच्या जाहिराती काही दिवस अगोदर प्रसिद्ध कराव्यात, शिवाजी महाराजांच्या नावे होणारे साहित्य संमेलन बंद करण्यात आले आहे ते पुन्हा सुरू करावे, ऐन मिरवणुकीच्या वेळी पोलीस परवानगी नाकारतात, त्यांना समज देण्यात यावी. शिवजयंती एका दिवसापूर्ती मर्यादित न ठेवता सात दिवस साजरी करावी, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवावेत, मिरवणूक मार्गावर महिलांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी, महापुरुषांच्या जयंती महोत्सवांवर न्यायालयाने घातलेल्या निर्बंधांवर पालिकेची भूमिका स्पष्ट करावी, शिवजयंतीनिमित्त पालिकेकडून घेतले जाणारे विविध कार्यक्रम उपनगरांमध्ये आणि समाविष्ट गावांमध्येही घ्यावेत, महात्मा फुले यांनी पहिली शिवजयंती हिराबाग चौक येथे साजरी केली. त्यामुळे या पालिकेने व्यासपीठासह इतर व्यवस्था करावी, जयंतीदिनी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा, अशा विविध मागण्या यावेळी सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आणि शिवप्रेमींनी केली.