जळगाव । महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी रविवारी 387 वी जयंती निमित्त शहरात विविध संघटना, संस्था, शाळा, महाविद्याल, पक्षांतर्फे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शहरातील संघटनांकडून मिरवणुका काढण्यात येणार आहेत. शिवाजी महाराजांच्या वेशभुषेत चिमुकले सहभागी होणार आहे. तर काही संस्थांकडून किर्तन-भजनाचे कार्यक्रम सायंकाळी घेण्यात येणार आहे.
विद्यापिठात व्याख्यान
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विचारधारा प्रशाळेतंर्गत छत्रपती शिवाजी महाराज अध्ययन व संशोधन केंद्रातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त इतिहासाचे अभ्यासक प्रा.सचिन गरुड यांचे सकाळी 11 वाजता विद्यापीठात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात ते ॠशिवचरित्राचे नवे आकलनॠ या विषयावर बोलणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीसीयुडी संचालक प्रा.पी.पी.माहुलीकर राहतील. अतिथी म्हणून पी.ई.तात्या उपस्थित राहणार आहेत. व्याख्यानाच्या पूर्वी सकाळी 8.00 वाजता मुलांच्या वसतिगृहापासून शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणूकीचे विसर्जन प्रशासकीय इमारतीसमोर होणार आहे. त्यानंतर हे व्याख्यान होईल.
प्रबोधपर किर्तन
वासुदेव,जोशी समाज बहुद्देशीय युवा फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची 387 वी जयंती निमित्त आज संध्याकाळी 6.30 वा. सप्तश्रृंगी माता चौक , वासुदेव जोशी कॉलनी येथे साजरी करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या माध्यमातून युवकांमध्ये समाज व राष्ट्र जागराची चेतना निर्माण करणे तसेच महाराजांच्या कार्य कर्तुत्वास उजाळा देणे हा उद्देश आहे. त्या अनुषंगाने ह.भ. प. भागवताचार्य युवा किर्तनकार माधव महाराज कुरे सोनपेठकर,पुणे यांचे समाज व राष्ट्र प्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
शिवजन्मोत्सव सोहळा
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रविवारी सायंकाळी 4.30 वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमीत्त सकाळी 9.30 वा. रक्तदान शिबीर घेण्यात येणार असुन प्रथम व द्वितीय वर्षच्या विद्यार्थ्यांतर्फे सायंकाळी 4.30 वा. शिवजन्मोत्सव सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणुन माजी खा. डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, डिन डॉ. एन.एस. आर्विकर, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. तरी या सोहळ्याला उपस्थित रहावे असे आवाहन प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांतर्फे करण्यात आले आहे.