जळगाव । छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने 12 ते 19 फेब्रुवारी दरम्यान शिव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून काल बालगंधर्व खुल्या नाट्यगृहात सकाळी 8 ते 11 दरम्यान चित्रकला रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सातपुडा ऑटोमोबाईलचे डी.डी. बच्छाव, महानगरपालिकेचे आरोग्यधिकारी डॉ. विकास पाटील, कवी अशोक कोतवाल, सुरेंद्र पाटील यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करुन केले. या स्पर्धेसाठी पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि सातवीच्या वर असे तीन गट तयार करण्यात आले होते. यात पहिल्या गटासाठी शहाजी महाराजांच्या खांद्यावर खेळणारे बालशिवाजी, दुसर्या गटासाठी राजे शहाजी आणि माता जिजाऊ यांच्या हातातील बालशिवाजी तर तिसर्या गटासाठी सोन्याच्या नांगराने शेती नांगरताना बालशिवाजी असे विषय देण्यात आले होते.
विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
या स्पर्धेत शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत बालचित्रकारांनी आपल्यातल्या कलाविष्काराचा जागर करीत मनसोक्त रंगांची उधळण केली. पहिले ते चौथीच्या पहिल्या गटात मोहित राजेंद्र पाटील (प्रथम), वरद जयेश मेंडकी (द्वितीय), लिना नितीन पाटील (तृतीय) तर उत्तेजनार्थ म्हणून रिया संजय महाजन, मोहित राजेंद्र नारखेडे, मानशी सतीश टोंगळे, अर्थव चौहान, जोगेश्वरी शैलेश सुर्यवंशी यांची निवड झाली.
मान्यवरांच्या हस्ते दिले पुरस्कार
विजेत्या स्पर्धकांना विजय भास्करराव पाटील, कैलासआप्पा सोनवणे, संतोष पाटील, एन. ओ. चौधरी, सुरेंद्र पाटील, खुशाल चव्हाण, महाजन सर, शंभू पाटील, फहीम पटेल यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. प्रत्येक गटात प्रथम, द्वतिय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ म्हणून 5 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्रही देण्यात आले.