मुंबई – मुंबईतल्या इतर बी.डी.डी. चाळींप्रमाणेच शिवडी भागातल्या बी.डी.डी. चाळींचाही पुनर्विकास करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी रविवारी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.
एका खाजगी कार्यक्रमासाठी गडकरी आज मुंबईत होते. नांदगावकर यांच्यासह चेतन पेडणेकर तसेच शिवडीच्या बी.डी.डी. चाळीतल्या भाडेकरूंचे प्रतिनिधींनी गडकरी यांची वरळीतल्या निवासस्थानी भेट घेतली. वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्ग बी.डी.डी. चाळींचा पुनर्विकास करण्याची राज्य सरकारने नुकतीच घोषणा केली. शिवडीच्या बी.डी.डी. चाळी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवर असल्यामुळे या चाळी या पुनर्वसन योजनेतून वगळण्यात आल्या आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीचे धोरण निश्चित होईल तोपर्यंत थांबू नये. येथील १२ इमारतींमध्ये ९६० भाडेकरू जीव मुठीत घेऊन राहत आहेत. येथेही इमारतींचे प्लॅस्टर कोसळत आहेत. त्यामुळे या इमारतींचाही त्वरीत पुनर्विकास करावा, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. याबाबतचे एक निवेदनही त्यांनी गडकरी यांना दिले. गडकरी यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली, असे नांदगावकर यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही आपण यापूर्वीच ही मागणी केली असल्याचे म्हटले आहे. लोकसभेत आपण वेळोवेळी याचा पाठपुरावा करत आहोत, असेही ते म्हणाले.