शिवणे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

0

तळेगाव दाभाडे : येथून जवळच असलेल्या शिवणे गावातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी तळेगाव दाभाडे येथे जातात. विद्यार्थ्यांसाठी तळेगाव दाभाडे येथून सकाळी एक बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून ही बस नियोजित वेळेपेक्षा 30 ते 40 मिनिटे उशिराने येते. त्यामुळे विद्यार्थी शाळेत वेळेवर पोहचत नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या विषयासंदर्भात अनेकदा तळेगाव आगारप्रमुख कार्यालयाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, तक्रारींची दखल घेतली जात नाही. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बस सकाळी वेळेवर सोडावी, अशी मागणीचे निवेदन नुकतेच तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी एसटी प्रशासनाला दिले.

समस्येचे निराकरण करा
मावळ तालुक्यातील शिवणे गावासाठी तळेगाव येथून सकाळी सात वाजता एक बस सोडण्यात येते. या बसने गावातील विद्यार्थी व नागरिक तळेगावला जातात. दररोज उशिरा येणार्‍या एसटी बसमुळे येथील विद्यार्थ्यांना दररोजच उशीर होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तर नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे.

एसटी बस वेळेवर येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात पोहोचण्यासाठी उशीर होत आहे. या समस्येचे निवारण करून मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी निवेदनात उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी केली आहे.