शेतीला पाणी नसल्याने इंदापूरमध्ये शेतकर्याने विहीरीत उडी मारून जीवन संपवले
मृत वसंत पवार हे इंदापूर अर्बन बँकेचे संचालक
आत्महत्येस जबाबदार असणार्यांवर गुन्हे दाखल करण्याची अंतिम इच्छा
कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनाही केले आवाहन
इंदापूर : इंदापूर अर्बन बँकेचे विद्यमान संचालक व शेतकरी वसंत सोपान पवार (48, रा. बेलवाडी) यांनी पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी मिळत नसून पिके जळत असल्यामुळे विहीरीमध्ये उडी मारुन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पवार यांनी आत्महत्यापूर्वी दोन चिठ्या लिहून ठेवल्या असून आत्महत्येस जबाबदार असणार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. यामध्ये जलसंपदाचे राज्यमंत्री विजय शिवतारे व पालकमंत्री गिरीष बापट यांच्या नावाचा समावेश आहे. वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार वसंत पवार यांचे लासुर्णेमध्ये हार्डवेअर व शेतीची औषधे व खतांचे दुकान आहे. तसेच त्यांची लासुर्णे व बेलवाडी परीसरामध्ये शेती आहे. शनिवारी ते दुकानबंद केल्यानंतर घरी गेलेच नव्हते. घरातील नागरिकांनी रात्रभर शोध घेतला. मात्र, ते आढळून आले नाहीत. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह बेलवाडी गावच्या हद्दीतील जामदारवस्तीजवळील विहिरीमध्ये पाण्यावर तरंगत असल्याचा दिसून आला.
पिके जळाली, कर्जबाजारी झालो
पोलिसांनी तातडीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्यांच्या खिशामध्ये दोन चिठ्या आढळल्या. यामध्ये गेल्या दोन वर्षापासून उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी कालव्याचे पाणी मिळाले नसल्यामुळे पिके जळाली आहेत. कर्जबाजारी झाल्यामुळे आर्थिक अडचणीमध्ये आल्यामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे, असे म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे तपास करीत आहेत. गतवर्षी व चालू वर्षीही नीरा डाव्या कालव्यातून उन्हाळी हंगामाचे पाणी वेळेत न मिळाल्यामुळे आत्महत्येस जबाबदार असणारे जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारे व पालकमंत्री गिरीष बापट यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी पवार यांनी मृत्युपूर्वी चिठ्ठीमध्ये लिहून ठेवली आहे.
पाटबंधारे विभागाची मनमानी बंद करा
माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, पंचायत समिती सदस्य अॅड. हेमंतराव नरुटे, कर्मयोगीचे संचालक वसंत मोहोळकर, दुधगंगाचे माजी अध्यक्ष शहाजी शिंदे, उपसरपंच प्रकाश चव्हाण यांनी सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवून कुंटूबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, असे वसंत पवार यांनी मृत्युपूर्वी चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले आहे. जलसंपदा विभागाच्या विस्कळीत कारभारामुळे गतवर्षी लासुर्णे, बेलवाडी परीसरातील शेतकर्यांना नीरा डाव्या कालव्यातून उन्हाळी पाण्याचे आवर्तन मिळाले नव्हते. यामुळे परीसरातील सात हजार एकरातील पिके जळून खाक झाली होती. यावर्षीही कालव्यातून पाणी मिळण्यास विलंब होत आहे. वसंत पवार यांच्यासह या परीसरातील शेतकर्यांनी 13 एप्रिल रास्तारोको करण्याचा इशारा दिला होता. मात्र पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी 42 व 43 क्रंमाकाच्या वितरिकेला 17 व 19 एप्रिल रोजी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अधिकार्यांनी पाणी सोडले नसल्यामुळे पिके जळण्यास सुरवात झाली आहे.