कमी दाबाने विजपुरवठ्याने नागरिक हैराण
भुसावळ- शहरातील वरणगावरोडवरील शिवदत्त नगर परिसरातील तब्बल १५० घरांना चार ते पाच महिन्यांपासून कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. महावितरणकडे वारंवार तक्रारी करुनही दखल घेतली जात नाही. यामुळे सोमवारी परिसरातील संतप्त रहिवाशांनी विज दिवे, सीएफएल आदी उपकरणांची रस्त्यावर तोडफोड करुन महावितरणचा निषेध नोंदवला. वरणगावरोडवरील शिवदत्त नगर भागात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कमी दाबाने विजपुरवठा होतो. या बाबत परिसरातील नागरिकांनी अनेकवेळा महावितरणकडे तक्रारी नोंदवल्या. मात्र ही समस्या सुटली नाही. कमी दाबाने घरातील पंखे, कुलर, वातानुकूलीत यंत्रणा असूनही कार्य करीत नाही. फ्रीज व अन्य महागड्या उपकरणांचे स्पेअर पार्ट जळण्याचे प्रमाण वाढले आहे. या प्रकरणी सोमवारी सांयकाळी सात वाजेच्या दरम्यान या भागातील रहिवाशांनी फ्यूज झालेले दिवे, सीएफएल, एलईडी दिवे, ट्यूबलाईट, कमी दाबामुळे जळालेले टिव्हीचे उपकरणे, फ्रीजचे कॉम्प्रेसर आदी वस्तू रस्त्यावर फेकून तोडफोड केली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या भागात येवून प्रत्यक्ष पाहणी करावी, ट्रान्सफार्मरची क्षमतावाढ करुन हा प्रश्न सोडवावा, अन्यथा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाईल, असा इशारा या भागातील रहिवाशांनी दिला आहे.