शिवधाम अपार्टमेंटमध्ये चोरीचा प्रयत्न

0

जळगाव । शहरातील निमखेडी रोडवरील शिवधाम अपार्टमेंटमधील घरात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने घराला सेंटर लॉक असल्यामुळे चोरट्यांकडून दरवाजा उघडला नाही. त्यामुळे घरातील 16 तोळे सोन्याचे दागिने चोरीस जाण्यापासून वाचले. शुक्रवारी दुपारी 2.30 जे 2.50 दरम्यान ही घटना घडली आहे. शिवधाम अपार्टमेंटमध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कर्मचारी प्रवीण उत्तम सोनवणे हे राहतात. त्यांचे चुलत भाऊ अमोल सोनवणे यांचे 12 डिसेंबर रोजी पालघर येथे लग्न झाले. अमोल हे शुक्रवारी सकाळी पत्नी तेजश्री यांच्यासोबत चाराकीने धरणगावमार्गे चुलत भाऊ प्रवीण यांच्या घरी आले होते. दरम्यान, धरणगाव येथे अमोल यांच्यासह सोन्याचे दागिने घातलेल्या नववधू तेजश्री एका मिटाईच्या दुकानावर थांबल्या होत्या. चोरट्यांनी येथेच त्यांची रेकी केली. त्यांनतर त्यांच्या मागेच चारचाकीने जळगावपर्यंत आले. हे दाम्पत्य शिवधाम अपार्टमेंटमध्ये प्रवीण सोनवणे यांच्या घरी सुमारे पाऊन तास थांबले. त्यानंतर प्रवीण सोनवणे यांच्या कुटुंबियांसह नवदाम्पत्य दुपारी 12.30 वाजता शेगाव येथे निघुन गेले. सोनवणे यांनी घर बंद करेपर्यंत चोरटे परिसरात थांबून रेकी करीत होते.

कारमधून आले चोरटे
दुपारी 2.30 वाजता संधी साधून चोरट्यांनी चारचाकी सोनवणेंच्या अपार्टमेंटबाहेर उभी केली. दोन चोरटे गाडीतच थांबले तर चौघांनी सोनवणेंचे घर गाठुन दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांवी कटरच्या साह्याने कडी-कोयंडा तोडला होता. परंतू सेंटर लॉक असल्यामुळे त्यांच्याकडून दरवाजा उघडलाच नाही. सुमारे 20 मिनीटे प्रयत्न करून देखील दरवाजा न उघडल्यामुळे तसेच अपार्टमेंटमध्ये काही लोकांनी चोरट्यांना हटकल्यानंतर अखेर त्यांनी 2.50 वाजता काढता पाय घेतला. सायंकाळी शेजारी राहणार्‍या एका व्यक्तीस सोनवणेंचा दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी फोन करून सोनवणेंना कळवले.

दरवाज्याची बेल बाजविण्याचा बहाणा
शिवधाम अपार्टमेंट हे तीन मजली आहे. सोनवणे दुसर्‍या मजल्यावर राहतात. चोरट्यांनी अपार्टमेंटच्या बाहेर चारचाकी उभी केली होती. दोन जण चारचाकीत तर चौघे दरवाजा उघडण्यासाठी गेले. दरवाजाजवळ चोरटे उभे असताना सोनवणे यांच्या शेजारी राहणार्‍या चौधरी नावाच्या महिलेने घराबाहेर येऊन चोरट्यांना हटकले. यावेळी आपण लग्नाच्या कामासाठी सोनवणेंच्या घरी असल्याचे उत्तर देत चोरट्यांनी दरवाजाची बेल वाजवण्याचा बहाणा केला. गेल्या आठवड्यात सोनवणेंच्या घरी लग्नाची लगबग असल्याचे चौधरींना माहिती होते. म्हणून त्या पुन्हा घरात निघुन गेल्या.

महिलेस पाहून चोरट्यांनी काढला पळ
दोन-तीन मिनीटांनी समोर राहणार्‍या बैरागी नावाच्या महिला अपार्टमेंटमध्ये आल्या. त्या तीसर्‍या मजल्यावर जाणार होत्या. त्या अपार्मेटमध्ये शिरताच चारचाकीत असलेल्या चोरट्यांनी फोन करून दरवाजा तोडत असलेल्यांना माहिती दिली. त्यामुळे त्यांनी काम थांबवले. परंतू दरवाजावर मारलेला दणका बैरागी यांनी ऐकला. संशय आल्यामुळे त्यांनी देखील चोरट्यांना हटकले. हे पाहून चोरट्यांनी पटापट पायर्‍या उतरून चारचाकीने पळ काढला.