शिवनेरी किल्ला संवर्धन व विकासावरील विशेष टपाल पाकीट लवकरच

0

जुन्नर । शिवनेरी किल्ल्याचे संवर्धन आणि विकास प्रकल्पावर विशेष टपाल पाकीट काढण्यात यावे, अशी मागणी जुन्नरच्या सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेने टपाल खात्याकडे केली होती. या मागणीची लवकरच पूर्तता होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या व शिवकालीन दुर्गबांधणीचे मॉडेल फोर्ट म्हणून विकसीत करण्यात येत असलेल्या किल्ले शिवनेरीच्या संवर्धन आणि विकास प्रकल्पावर भारतीय टपाल विभागाच्या वतीने विशेष टपाल पाकीट काढण्यात येणार आहे.

86 कोटींचा निधी मंजूर
शिवनेरीचे संवर्धन आणि विकास प्रकल्प राज्य शासनाकडून 2002 पासून सुरू आहे. विविध टप्प्यांवर सुमारे 86 कोटी रुपयांचा निधी विविध खात्यांना मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने वन, भारतीय पुरातत्व, सार्वजनिक बांधकाम विभागांचा समावेश आहे. या विविध विभागांच्या वतीने शिवनेरी किल्ल्यावरील विविध संवर्धन आणि विकासाची कामे करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने विविध वास्तुंचे संवर्धन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
येत्या शिवजयंतीला (19 फेब्रुवारी 2018) शिवनेरी किल्ल्यावरील शिवजंयती सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या विशेष पाकिटाचे प्रकाशन करण्याचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी सर्व आवश्यक पाठपुरावा करण्यात येणार आहे, असे सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेचे अध्यक्ष संजय खत्री यांनी सांगितले.

टपाल विभागाने मागविला प्रस्ताव
किल्ल्याच्या संवर्धन आणि विकासासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध असलेला शिवनेरी राज्यातील एकमेव किल्ला आहे. यामुळे किल्ल्यावरील शिवजन्मस्थानाच्या वास्तुच्या संवर्धनातील विविध टप्प्यावरील छायाचित्रांचा समावेश असणारे विशेष पाकिट काढावे, अशी मागणी सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेच्या वतीने पुणे विभागाचे पोस्ट मास्तर जनरल गणेश सावळेश्‍वरकर यांच्याकडे केली होती. या मागणीला टपाल विभागाने सकारात्मक प्रतिसाद देत संस्थेला सविस्तर प्रस्ताव पाठविण्यातबाबतचे पत्र दिले आहे. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव टपाल विभागाला पाठविला जाणार आहे.

प्रकाशन शिवजंयतीला
अनास्थेमुळे शिवकालीन किल्ले ढासळत असताना शिवनेरी किल्ले संवर्धन आणि विकास प्रकल्पातून किल्ल्यांचे संवर्धन झाले आहे. हा किल्ला संवर्धन कामासाठी दिशादर्शक ठरला असून, किल्ले संवर्धनाबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी विशेष टपाल पाकीट काढण्याची संकल्पना संस्थेने टपाल विभागाला सुचविली. टपाल विभागाने देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आम्ही शिवजंयतीला या पाकिटाच्या प्रकाशानासाठी प्रयत्नशील आहे.
– धनंजय कुलकर्णी,
सचिव, सह्याद्री गिरिभ्रमण संस्था