भोसरी : येथील शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरात 200 जणांची तपासणी करण्यात आली. शिबिरामध्ये हृदयरोग, नेत्ररोग व मधुमेह तपासणीसह विविध तपासण्या करण्यात आल्या. शिवनेर नागरी सहकारी पतसंस्था व सह्याद्री हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले.
यावेळी नगरसेविका प्रियंका बारसे, अनुराधा गोफणे, पतसंस्थेचे अध्यक्ष कैलास आवटे, उपाध्यक्ष बाळु गुंजाळ, संचालक मुकुंद आवटे, संगीता इंगळे, सुहास गटकळ, अरुण डेहनकर, शांताराम कुंभार, निंबा डोळस, बाळु भोर, अॅड. सूर्यकांत काळे, प्रवीण गटकळ, निलेश मुटके, शांतीश्वर पाटील, ज्योती हांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण हाडवळे आदी उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने पतसंस्थेने हे आरोग्य तपासणी शिबिर घेतले. या शिबिरात मोफत रक्तदान तपासणी, मोफत रक्तातील साखर तपासणी, मोफत डोळ्यांची तपासणी, मोफत ईसीजी आणि इतर तपासण्या करण्यात आल्या. तसेच, तज्ज्ञांकडून मोफत वैद्यकीय सल्ला आणि महागाड्या तपासण्यांसाठी विशेष सवलतीची सुविधा रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आली.