वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
भोसरी- येथील शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, शिष्यवृत्ती आणि विविध क्षेत्रात नैपुण्य मिळविणार्या सभासदांच्या 70 पाल्यांचा रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गुणवंत गुणगौरव करण्यात आला. तसेच वाचन संस्कृती वाढण्यासाठी पुस्तक भेट देण्यात आले. शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी अंकुशराव नाट्यगृहात पार पडली. या सभेमध्ये पतसंस्थेच्या सर्व सभासदांना 12 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष कैलास आवटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमासाठी संचालक निंबा डोळस, निलेश मुटके, अरुण डेहनकर, शांताराम कुंभार, अॅड. सूर्यकांत काळे, प्रवीण गटकळ, शांतीश्वर पाटील, बाळू भोर, संचालिका ज्योती हांडे, संगीता इंगळे, नगरसेवक विलास मडेगिरी, नगरसेविका प्रियंका बारसे, अनुराधा गोफणे आदी उपस्थित होते.
संस्कारांमुळे आव्हाने पेलण्याची ताकद
विद्यार्थ्यांवर बालपणी योग्य संस्कार होणे अतिशय गरजेचे आहे. हे संस्कार पुढे विद्यार्थ्याला आयुष्यभर कामी येतात. उत्तम संस्कार आणि विचारांवर जीवनातील विविध आव्हाने पेलण्याची ताकद प्रत्येकामध्ये निर्माण होऊ शकते, असे मार्गदर्शन पत्रकार अनिल कातळे यांनी विद्यार्थ्यांना केले. संस्थेचे अध्यक्ष कैलास आवटे म्हणाले, संस्थेच्या सर्व सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहायला हवे. तसेच सर्व सभासदांनी ठेवीचे आणि कर्जाचे व्यवहार करून सतत क्रियाशील सभासद राहावे. संस्थेच्या सभासदांना व गुणवंत विद्यार्थ्यांना सभासद वाढीचे आणि ठेवी ठेवण्याचे आवाहन आवटे यांनी केले. यावेळी नगरसेवक विलास मडिगेरी, प्रियंका बारसे यांनी देखील मार्गदर्शन केले.