लखनऊ । मार्च महिन्यात झालेल्या विधानसभांच्या निवडणुकीतील दारुण पराभवानंतर शेवटी समाजवादी पार्टीची दोन शकले उडाली आहेत. समाजवादी पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे काका आणि मुलायमसिंग यांचे बंधू शिवपाल यादव यांनी शुक्रवारी समाजवादी सेक्युलर मोर्चा नावाच्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या नव्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुलायमसिंग यादव असतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीनंतर जसवंतनगरचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष शिवपाल यादव यांच्यावर अखिलेश आणि समाजवादी पार्टीचे महासचिव रामगोपाल यादव यांनी टीकेचे लक्ष्य केले होते. समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंग यादव यांची शिवपाल यादव यांनी शुक्रवारी इटावा येथे भेट घेतली. त्यानंतर इटाव्यातील आपल्या नातेवाइकांच्या घरी शिवपाल यादव यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. दोन दिवसांपूर्वी शिवपाल यादव यांनी आपले चुलतबंधू रामगोपाल यादव यांच्यावर हल्लाबोल केला होता. रामगोपाल यादव यांच्यावर टीका करताना त्यांना शकुनीची उपमा शिवपाल यादव दिली होती. प्रसिद्धी माध्यमाकडून होणारी विचारणा आणि शिवपाल यादव यांच्या टीकेमुळे उदिग्न झालेल्या रामगोपाल यादव यांनी सांगितले की, शिवपाल यादव निरर्थक बडबड करत असून त्यांनी समाजवादी पार्टीची घटना नीट वाचलेली नसावी. पार्टीची सदस्य नोंदणी मोहीम सुरू असून, शिवपाल अजूनही पार्टीचे प्राथमिक सदस्य झालेले नाहीत.
अखिलेशने अध्यक्षपद सोडावे
उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी मुलायमसिंग यांना राष्ट्रीय अध्यक्षपदावरून अखिलेश यांनी हटवले होते. त्यावेळी आपण केवळ तीन महिन्यांकरिता रााष्ट्रीय अध्यक्षा झालो आहोेत. निवडणुकीनंतर पुन्हा मुलायमसिंग यांच्याकडे पद सोपवू. असे अखिलेश सिंग यांनी म्हटले होते. मात्र, निवडणुका झाल्यानंतर महिन्याभराच्या अवधीनंतरही अखिलेश यांनी पद आपल्याकडेच ठेवले आहे. अखिलेश यांनी पद सोडावे, अशी शिवपाल यादव यांची मागणी होती.
घरातही फूट
समाजवादी पार्टीच्या अध्यक्षपदावरून मुलायम सिंग यांच्या घरातही फूट पडलेली आहे. मुलायम सिंग यांना राष्ट्रीय अध्यक्षपद द्यावे, असे अपर्णा यादव यांनी यापूर्वीच सांगितले होते. यादव कुटुंबीयातील मुलायम सिंग यादव, त्यांची दुसरी पत्नी साधना यादव, दुसरा मुलगा प्रतीक यादव, त्याची पत्नी अपर्णा यादव, शिवपाल यादव एका बाजूला आहेत, तर रामगोपाल यादव यांनी सुरुवातीपासूनच मुलायम सिंग आणि शिवपाल यादव यांच्याविरोधात अखिलेशची बाजू घेतली आहे. मुलायमसिंग यादव यांना राष्ट्रीय अध्यक्षपदावरून बाजूला काढण्यात रामगोपाल यादव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.