गावात तणावपूर्ण शांतता ; होमगार्डलाही मारहाण, दुचाकीचे केले नुकसान
भुसावळ– तालुक्यातील शिवपूर कन्हाळा येथे लग्नात नाचण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाल्याने एका गटाने गावातील तीन रिक्षांचे काच फोडत एका दुचाकीची तोडफोड केल्याची घटना मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली.
या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली असून जमावाने एका होमगार्डलाही मारहाण केल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, बाजारपेठ निरीक्षक चंद्रकांत सरोदे, प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले, तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आर.एन.होळकर, उपनिरीक्षक सचिन खामगड यांच्यासह तालुका पोलीस व आरसीपी प्लाटूनने घटनास्थळी धाव घेत शांतता निर्माण केली. घटनेनंतर पोलिसांनी धरपकड सुरू करीत आठ जणांना ताब्यात घेतले. लग्नात नाचण्यावरून तसेच दारू पिण्यावरून वाद उफाळल्याने दंगल उसळल्याचे बोलले जात आहे. रात्री उशिरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.