भुसावळ- तालुक्यातील शिवपूर-कन्हाळा शिवारात नाल्याकाठी गावठी दारू बनविली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत कुंभार यांच्या नेतृत्वात पथकाने बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास धाड टाकून 42 हजार 100 रुपये किंमतीची गावठी दारूसह रसायन नष्ट केले. सुभान तुकडू गवळी यांच्या मालकिची ही गावठी भट्टी असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी गवळी घटनास्थळावरून पसार झाला असून त्याच्याविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला तर त्यास लवकरच अटक करू, असे पोलिस निरीक्षक चंद्रकांत कुंभार म्हणाले. दरम्यान, घटनास्थळावर पथकाला गुळ व नवसागर मिश्रीत कच्चे रसायनाचे भरलेले 10 पत्री ड्रम, दोन हजार लिटर गरम रसायन व तयार हातभट्टीची 35 लिटर दारू मिळून एकूण 42 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जागीच पंचांसमक्ष नष्ट करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलिस उपनिरीक्षक गजानन करेवाड, हवालदार विठ्ठल फूसे, अजय माळी, रीयाज शेख, उमेश बारी आदींच्या पथकाने केली.