नाशिक । यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार ज्येष्ठ कन्नड साहित्यिक प्रा. डॉ. एच. एस. शिवप्रकाश यांना जाहीर झाला आहे. सोबतच बाबुराव बागुल कथालेखन पुरस्कार लातूरच्या मेनका धुमाळे यांना जाहीर करण्यात आला आहे. मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई वायुनंदन यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.
मुक्त विद्यापीठातर्फे दरवर्षी देशभरातील साहित्यिकांना कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविले जाते. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे त्याचे स्वरूप आहे. डॉ. शिवप्रकाश यांचे इंग्रजी आणि कन्नड या भाषांतील साहित्यात मोठे योगदान आहे. त्यांनी नऊ काव्यसंग्रह संपादीत केले असून, पंधरा नाटकांचे लेखन केले आहे. त्यांच्या कवितांचे भारतीय आणि युरोपीय भाषांत अनुवाद झाले आहेत. अनेक देशी-विदेशी नियतकालिकांतून त्यांचे साहित्य प्रकाशित झालेले आहे. डॉ. शिवप्रकाश यांनी त्यांच्या कारकिर्दीत वाङमयीन व नाट्यविषयक चर्चासत्रांचे देशभर आयोजन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. साहित्य अकादमीच्या ‘इंडियन लिटरेचर’ या नियतकालिकाचे त्यांनी अनेक वर्ष संपादनही केले. विद्यापीठातर्फे दिला जाणारा 2016 या वर्षाचा बाबुराव बागूल कथालेखन पुरस्कार लातूर येथील नवोदित कथा लेखक मेनका बाबुराव धुमाळे यांना त्यांच्या ‘कोरडा पाऊस’ या कथासंग्रहास जाहीर करण्यात आला आहे. येत्या 15 जून रोजी मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीत सकाळी 11 वाजता पुरस्कार वितरणाचा सोहळा होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.