‘शिवबंधनात’च राहणार!

0

पक्षबदलाच्या चर्चेला खा. शिवाजीराव आढळरावांकडून पूर्णविराम

पिंपरी-चिंचवड : काहींचा असा समज झाला आहे की मी बैलगाडा शर्यतीमुळेच खासदार झालो आहे. त्यामुळे काहीजण श्रेयवादाचे राजकारण करून खासदार होण्याची स्वप्ने दिवसाउजेडी पाहत आहेत, या शब्दांत नामोल्लेख टाळून शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भोसरेचे आ. महेशदादा लांडगे यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले. मी पक्षबदलाचा प्रश्नच येत नाही. शेवटपर्यत शिवबंधनातच राहणार असून, शिरुरचा शिवसेनाचा गढ आजही आणि पुढेही अढळच राहणार आहे, असेही त्यांनी नीक्षून सांगितले. आकुर्डी येथील दैनिक जनशक्तिच्या मुख्य कार्यालयास खा. आढळराव यांनी गुरूवारी सायंकाळी भेट दिली. सुमारे दीड तासांच्या गप्पांमध्ये त्यांनी संपादकीय विभागाशी दिलखुलास बातचीत केली. मुख्य संपादक कुंदन ढाके यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी व्यवस्थापकीय संचालक किरण चौधरी, सरव्यवस्थापक हणुमंत बनकर, सहाय्यक संपादक अविनाश म्हाकवेकर, जाहिरात व्यवस्थापक अमित शिंदे, विशेष राजकीय प्रतिनिधी बापू जगदाळे, वरिष्ठ उपसंपादक प्रशांत भदाणे यांच्यासह शिवसेनेच्या माजी गटनेत्या सुलभा उबाळे, आबा लांडगे, प्रा. दत्तात्रय भालेराव, सुरज लांडगे, नीलेश मुटके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
बैलगाडात श्रेयवादाचे राजकारण!
खा. आढळराव म्हणाले, बैलगाडा शर्यतीमुळेच मी खासदार झालो असा काहींनी समज करुन घेतला आहे. यातूनच या शर्यतीला लोकसभेच्या निवडणुकीची शर्यत समजून काहींनी बैलगाडा प्रकरणात श्रेयवादाचे राजकारण केले. विधानसभेवर बैलगाडा मोर्चा काढला, मुख्यमंत्र्यांची बैलगाडीमध्ये बसवून मिरवणूक काढली, प्राणी मित्र संघटनांना डिवचण्याचे काम केले. या अगोदरही न्यायालयाने शर्यतीवर घातलेली बंदी मी सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करुन दोन वर्षे उठवली होती. 2014 सालीदेखील सर्वप्रथम पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे या बंदी बाबत बैठक घेऊन प्राणीमित्र संघटनेचे आरोप चुकीचे असल्याचे ठणकावून सांगून यासाठी शेवटपर्यंत मी प्रयत्न केले. केंद्र सरकारच्या नदी स्वच्छ अभियानातदेखील इंद्रायणी नदीचा समावेश करुन घेतला; पण याचे श्रेय मला मिळू नये त्यासाठी जनतेला त्रास सहन करावा लागेला तरी चालेल, अशी सध्याची विरोधकांची भूमिका आहे. त्यामुळे अनेक जुने लोकोपयोगी प्रोजेक्ट थांबले आहेत.
मीच असेल पुन्हा खासदार
अनेक वेळा माझ्या बाबतीत पक्ष बदलण्याबाबत चुकीचा अपप्रचार केला जातो. पण मी शेवटपर्यत शिवबंधनातच राहणार असून, शिरुरचा शिवसेनाचा गढ आजही व पुढेही अढळच राहणार आहे. व पुढील 2019 च्या निवडणुकीतदेखील मीच विजयी होणार आहे. यासाठी भोसरीमधील खेड, मंचर, जुन्नर व आंबेगावातील 30 टक्के व मराठवाडा आणि विर्दभातील सुज्ञ व सुशिक्षीत मतदार व्यक्तीबघूनच मतदान करतील याची मला पुरेपूर जाणीव आहे. 2009 साली राज्यात प्रबळ असलेल्या राष्ट्रवादी पक्षाचे सर्वच आमदार माझ्या लोकसभा मतदारसंघात असूनही माझा विजय झाला तर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीदेखील माझा लोकसंपर्क पाहून शिरुरऐवजी माढा मतदारसंघाची निवड केली होती. राष्ट्रवादीची कमी होत असलेली ताकद व भाजपची वाढलेली ताकद पाहता माझ्या मतदान टक्केवारीवर किचिंतसा फरक पडेल; पण विजय माझाच असेल, असेही खा. आढळराव म्हणाले. येथील जनतेचेेेेेेेे असणारे माझ्यावरील प्रेम, माझ्यावरील विश्वास व त्यांचा मला असणारा पाठिंबा या जोरावर मी शिरुर लोकसभा मतदारसंघात अढळस्थान निर्माण करु शकलो. पण हे करीत असताना रेड झोन व विमानतळासाठी अधिक प्रयत्न करु शकलो नाही याची खंतदेखील आहे, असेही त्यांनी कबूल केले.
महापालिकांसाठी मोठा निधी आणला
पुणे-नाशिक रेल्वे मार्ग करण्यासाठी 1998 सालापासून व सुरेश कलमाडी रेल्वेमंत्री असल्यापासून लोकांची मागणी आहे. पण त्याकडे माझ्यापूर्वीच्या नेत्यांनी दुर्लक्ष केले होते. सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असताना व नंतरदेखील मलिक्कार्जुन खर्गे रेल्वेमंत्री असताना दहा वर्षापासून सतत पाठपुरावा करुन त्याला साडेतीन हजार कोटीचा निधी मिळवून देण्याचे काम केले. यामुळे खेड, चाकण, आंबेगाव, जुन्नर व शिरुर तालुक्यातील अनेक गावे विकासाच्या प्रवाहात येण्यास मदत होणार असून, येथील बाजारपेठांही विकसित होण्यास मदत होणार आहे. तसेच परदेशातील दौरे करताना तेथील शाळेतील चांगल्या सोयीचा फायदा मतदारसंघातील शाळेसाठी करुन घेतला. आरोग्यासाठीदेखील पिंपरी व पुण्यातील महानगरपालिकासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला. तर एक गाव वाड्यावस्तीदेखील निधीतून सुटल्या नाहीत, असेही खा. आढळराव म्हणाले. मागील तीन वर्षात भाजप सरकारचा एकही प्रकल्प कुठे सुरु असल्याचे दिसत नाही. जे आहेत सर्व प्रकल्प जुन्याच सरकारचे आहेत. उद्योगांचे कंबरडे मोडले असून पाच लाख उद्योग बंद आहेत. यामुळे 16 लाख नोकर्‍या गेल्या आहेत. दोन टक्के जेडीपी दर खाली आला असून, सर्वत्रच चिंतेचे वातावरण आहे, अशी नाराजीही खा. आढळराव यांनी व्यक्त केली.
भोसरीतील राजकारण राजाबाबू चित्रपटासारखे!
सध्या भोसरीतील राजकारण पाहुन अभिनेता गोविंदा याचा राजाबाबू चित्रपटाची आठवण येथील मतदारांना येते. ज्या पध्दतीने त्या चित्रपटात राजाबाबू हे पात्र रंगवित असलेल्या गोविंदा यांच्याकडे कोणतीही शैक्षणिक पदवी नसतानादेखील अनेक पदवी घेतलेले पदवीप्रदान सोहळ्यातील छायाचित्रे घरात लावलेली असतात, यात रजनीकांतलाही मागे टाकेल असे ते दृष्य पाहण्यास मिळते असाच काहीचा प्रकार भोसरीतील सध्याच्या चालू असलेल्या राजकारणातील घडामोडीवरुन पाहण्यास मिळत आहे. रस्त्याचे कामे करतो मी पण चकाकणार्‍या काळ्या डांबराचे संग्रहीत खोटेखोटे फोटो काडून फेसबुक व व्हॉटसअ‍ॅपवर दाखवून नागरिकांची दिशाभूल केली जाते. पण हे करत असताना ते रस्ते कुठल्या परिसरातील आहेत त्याचे नाव हे जाणीवपूर्वक टाकले जात ऩाही. असा प्रकार अनेक विकासकामांबाबत व इतरही प्रकरणात होतो. पण जनता सुज्ञ आहे. मी पदासाठी किंवा मंत्री होण्यासाठी राजकारणात नाही तर समाजकारणासाठी आहे. त्यामुळे मी नागरीकांच्या मनामनात व घराघरात आहे, असा टोलाही खा. आढळराव यांनी आ. महेशदादा लांडगे यांचा नामोल्लेख टाळून त्यांना हाणला.