शिवबा ग्रुपच्या चौघांना 5 वर्ष सक्तमजुरी

0

कोपर्डी आरोपींवरील हल्ल्याचे प्रकरण

अहमदनगर : कोपर्डी प्रकरणातील दोषींवर जिल्हा न्यायालयाच्या आवारात प्राणघातक हल्ला करणार्‍या राजेंद्र जर्‍हाड (21), बाबूराव वालेकर (30), अमोल खुणे (25) आणि गणेश खुणे (27) या चौघांना न्यायालयाने बुधवारी पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. राज्यभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणातील दोषींवर न्यायालयाच्या आवारात हल्ला झाला होता. या प्रकरणी मराठवाड्यातील शिवबा ग्रुपच्या चार जणांना अटक करण्यात आली होती. हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, शस्त्र प्रतिबंधक कायदा, अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही फुटेजचा पुरावा
जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी राजेंद्र आणि त्याच्या साथीदारांना मंगळवारी दोषी ठरवले होते. या खटल्यात सरकारतर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. हल्लेखोरांचा कोपर्डीतील आरोपींना मारण्याचाच उद्देश होता, अन्यथा जालवा व बीड येथील रहिवासी असलेल्यांचा नगरच्या जिल्हा न्यायालयात येण्याचा काहीच उद्देश नव्हता. कोपर्डीतील आरोपींना मारण्याचेच कटकारस्थान रचल्याने चौघे जण न्यायालयाच्या आवारात आले. नगरच्या कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे कोपर्डी बलात्कारप्रकरणातील जीव वाचला. न्यायालयाच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजमध्येही चौघांचे चित्रीकरण आढळले आहे, असा युक्तिवाद सरकारतर्फे करण्यात आला होता. हा युक्तिवाद ग्राह्य धरताना न्यायालयाने चारही आरोपींना दोषी ठरवले. या चौघांच्या शिक्षेवर बुधवारी न्यायालयाने निर्णय दिला.