तळोदा। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत गोरगरीब, शेतकरी, शेत मजूर यांना पोटभर जेवण मिळावे , या अनुषगाने सुरु करण्यात आलेल्या शिवभोजन योजनेअन्तर्गत भोजनासाठी लोकांकडून वसूल करण्यात येणारा मोबदला हा येथील प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक हे स्वखर्चाने करणार आहेत. याबाबत त्यांनी तहसीलदार पंकज लोखंडे यांच्याकड़े लेखी निवेदन सादर केले आहे.
राज्य शासनाच्या पुढाकाराने १ एप्रिल २०२० पासून तळोदा शहरात २ ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आले आहेत.नियमित म्हणजेच रोज २०० गरजु लोकांना भोजन दिले जात असून त्या जेवणापोटी गरजू व गरीब लोकांना रक्कम अदा करावी लागत असल्याने हातावर काम करुन पोट भरणाऱ्या कुटुंबाला आपल्या कुटुंबासाठी रोज एकावेळीस ४० ते ५० रूपये देणे ही जिकरीचे होत असल्यामुळे त्यांच्यातील काही लोकांनी नगरसेवकांना भेटून या भोजनासाठी आमच्याकडे पुरेसे पैसे नसल्याचे सांगितल्यावर त्यांनी लागलीच तहसिलदारांची भेट घेत ह्या विषयावर चर्चा केली. १४ एप्रिलपर्यत जेवणासाठी येणाऱ्या लोकांकडून कुठलाही मोबदला घेऊ नये तो सर्व खर्च आम्ही उचलु अशी विनंती केल्यानतर त्यास होकार दर्शवण्यात आला. यावेळी नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, नगरसेविका अनीता परदेशी, स्वीकृत नगरसेवक जितेंद्र माळी आदी उपस्थित होते.