शिवराज्याभिषेक साठी जाणार जिल्ह्यातून ६ हजार शिवप्रेमी

0

जळगाव : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोस्तव समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही रायगडावर 5 व 6 जून अशा दोन दिवसीय शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी प्रत्येक तालुक्यातील 15 गाड्या रवाना होणार असून सोहळ्यासाठी रायगडावर जिल्ह्यातून 6 हजार शिवप्रेमी जाणार आहे, अशी माहिती शिवराज्याभिषेक सोहळ्याचे जिल्हा सदस्य उज्वल पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

या वर्षी या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे या राज्यभिषेक सोहळयाला संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 5 व 6 जून अशा दोन दिवशी सोहळ्यात विविध कार्यक्रम होणार असून शिवराज्याभिषेक कार्यक्रमाला देशभरातून इतिहास संशोधक, अभ्यासक, शिवभक्त, इतिहासप्रेमी, मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचेही उज्ज्वल पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला समाधान धनगर यांचीही उपस्थिती होती.

असा होणार सोहळा
5 जून रोजी संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती यांचे स्वागत व शिवभक्तासोबत पायी चालण्यास सुरुवात, गडपुजन, जागर शिवकालीन युद्धकलेचा, रायगड विकास प्राधिकरणानेकेलेल्या विकास कामांचे प्रदर्शन व खोदकामात सापडलेल्या वस्तूंचे प्रदर्शन, अन्नछत्राचे उद्घाटन, गडदेवतेचा गोंधळ, रात्री शाहिरांचा कार्यक्रम, व कीर्तन होईल. याच दिवशी कला जागर शिवकालीन युद्धकलेचा हा मर्दानी खेळाचा प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम होईल, तसेच महाराष्ट्रातील युद्धकला कशी असते या कार्यक्रमातून दाखवण्यात येणार आहे. यात या मध्ये पट्टा, तलवार, भाला, जंबिया, कट्यार, माडु, फरी, गलका, अशा विविध प्रकारचे सादरीकरण होणार आहे. तर 6 जून रोजी सकाळी ध्वजारोहण, शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक होईल यानंतर ’सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा या घोषवाक्याला अनुसरुन पालखी मिरवूणक निघले. त्यात महाराष्ट्रातील बारा बलुतेदार, अठरा अलूतेदारासंह सर्व धर्मातील लोक सहभागी होणार आहे. यात आपापल्या पारंपरिक लोककलांचे सादरीकर केले जाणार आहे. यावेळी शाहिरांचा कार्यक्रम होणार आहे.

शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
प्रत्येक तालुक्यातून 15 गाड्या सोहळ्यासाठी रवाना होणार आहे. या गाड्यांमधून शिवप्रेमी रायगडावर पोहचतील. तसेच काही शिवप्रेमी आपआपल्या पातळीने रेल्वे, बस, अथवा इतर वाहनांनी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. अशा प्रकारे अंदाजे सहा हजार शिवप्रेमी जिल्ह्यातून सोहळ्यात सहभागी होतील, असे पाटील यांनी सांगितले. तसेच शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सोहळ्याला उपस्थित द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.