ना. धनंजय मुंडे यांचा जळगावमध्ये इशारा
रावेर : छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन जो पक्ष सत्तेत आला त्याच पक्षाचा उपमहापौर छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरतो. त्याच भाजपचा एखादा नेता किंवा मुख्यमंत्री साधी खंतही व्यक्त करत नाहीत. या पुढे जर महाराजांचा अपमान केलात तर भाजपचा ’बी‘देखील राज्यात उरणार नाही, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला. शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अहमदनगर येथील भाजपचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्यावर टीकेची झोड उठवत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनानिमित्त रावेर येथे जाहीरसभा पार पडली यावेळी ते बोलत होते. या सभेत खा. सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, गफार मलिक यांची भाषणे झाली. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जयंत पाटील, भास्कर जाधव, माजी आमदार अरुण पाटील, चित्राताई वाघ उपस्थित होते.
माझा शेतकरी चोर आहे का?
आठवड्याभरापूर्वी मराठवाडासह राज्यभरात काही जिल्ह्यांंना अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपले. त्यात शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या भागात सरकारतर्फे सुरू असलेल्या अवमानकारक पंचनाम्यावरून धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. मराठवाड्यातील गारपीटग्रस्त भागात अत्यंत वाईट पद्धतीने पंचनामे होत आहेत. शेतकर्यांच्या गळ्यात पाटी लटकवली जाते, त्या पाटीवर शेतकर्याबाबत माहिती लिहिलेली असते. हा शेतकर्यांचा अपमान आहे. माझा शेतकरी चोर आहे का? असा संतप्त सवाल मुंडे यांनी सरकारला केला.
सरकार शिवजयंती विसरले!
मॅग्नेटिक महाराष्ट्राचा मोठा इव्हेंट मुंबईत पार पडला. त्या इव्हेंटच्या सर्व वृत्तपत्रांना सरकारने मोठ्या जाहिराती दिल्या. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची एकही जाहिरात सरकारने दिली नाही. मी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारतो की, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन तुमचे सरकार सत्तेत आले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जाहिराती का दिल्या नाहीत? काल जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली गेली. मात्र संघाच्या एकाही शाखेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली गेली नाही, असा आरोपही मुंडे यांनी केला.