चाकण । नुसत्या जयंत्या, उत्सव साजरे करण्यापेक्षा शिवरायांचे विचार रोजच्या दैनंदिन जीवनात आचरणात आणणे ही काळाची गरज आहे, असे विचार राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. रोहिदास महाराज हांडे यांनी येथे व्यक्त केले. छत्रपती ग्रुप व कुशलभाऊ जाधव युवा मंचच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून नाणेकरवाडी (ता.खेड) येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर व्याख्यानात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष कुशल जाधव हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या मान्यवरांची उपस्थिती
यावेळी नाणेकरवाडीचे माजी उपसरपंच गणेश पवार, उद्योजक अतुल नाणेकर, चक्रेश्वर पतसंस्थेचे संचालक सोमनाथ बिरदवडे, शुभम नाणेकर, उद्योजक संदीप जाधव, महेश जाधव, किरण वाळूंज, विशाल जाचक, संदीप कानपिळे, सुनील जाधव, सागर मिटकरी, प्रमोद गोसावी, आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती ग्रुपचे योगदान प्रेरणादायी
छत्रपती ग्रुपच्या उपक्रमांचे कौतुक करून हांडे महाराज म्हणाले, लोकोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी छत्रपती ग्रुप व कुशल जाधव यांचा आदर्श समाजाला दिशा देणारा आहे. छत्रपती ग्रुपचे योगदान समाजासाठी खरोखरच प्रेरणादायी व स्फूर्तीदायी आहे. असेच उपक्रम अखंडपणे राबविण्याची नितांत गरज आहे. अशा उपक्रमांमुळे राजांचे आचार विचार समाजापर्यंत पोहचण्यासाठी निश्चित मदत होणार आहे. नुसत्या जयंत्या उत्सव साजर्या करण्यापेक्षा राजांचे विचार आत्मसात करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविण्याची नितांत गरजेचे आहे. त्यासाठी सेवाभावी संस्था पुढे सरसावल्या पाहिजेत. अतुल नाणेकर यांनी प्रास्ताविक केले. सोमनाथ बिरदवडे व गणेश पवार यांनी स्वागत केले. कुशल जाधव यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले.