शिवरायांचे स्वप्न साकारण्यासाठी प्रत्येक क्षणाला त्यांचे विचार अवलंबिले पाहिजेत

0

पुणे । देवाला दुधाचा अभिषेक करून एकमेकांविरुध्द लढणारे अनेक सत्ताधारी नेते पाहिले आहेत. परंतु रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकच राजे होते. शिवरायांनी स्वराज्य निर्मितीसाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. त्यामुळे त्यांची जयंती फक्त एक दिवस नाही तर त्यांच्या संकल्पनांतून रोज साजरी झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करायचे असेल तर प्रत्येक क्षणाला त्यांचे विचार अवलंबले पाहिजेत, तर खर्‍या अर्थाने शिवजयंती साजरी होईल, असे मत बीड जिल्ह्यातील जंगम मठ मन्मथधाम संस्थान कपिलधारचे वेदांताचार्य, वीरशैवाचार्य, श्री सदगुरू डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांनी व्यक्त केले.

शिवजयंतीनिमित्त गुरुवार पेठेतील प्रभात मित्र मंडळातर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी हुतात्मा मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांना प्रभात शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्यावतीने हा पुरस्कार त्यांचे मामा संजय येरणे यांनी स्विकारला. यावेळी सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, उत्सव प्रमुख नितीन राऊत, निलेश कांबळे आदी उपस्थित होते. मानपत्र, रोख 11 हजार रुपये, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

सैनिक सीमेवर लढत असतात, त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना मदत करणे, त्यांचा सन्मान करणे ही देखील एकप्रकारे देशभक्तीच आहे. छत्रपती शिवरायांनी दिलेली शिकवण लक्षात ठेवून आपण कार्य केले पाहिजे, असे दिलीप कांबळे यांनी सांगितले. संजय येरणे म्हणाले, देशातील प्रत्येक व्यक्तीला सीमेवर जाऊन देशाचे रक्षण करण्याचा मान मिळतोच असे नाही. परंतु रोजच्या जीवनात आपल्याकडून देशाचे, समाजाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली तर ती देखील देशभक्ती आहे.

आकर्षक जिवंत देखावे
शिवप्रतिमा असलेला तुळजाभवानी देवीचा आकर्षक रथ, सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविणारा समरसता रथ, तसेच महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष शाहीर दादा पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेला शिवा काशीदचे बलिदान हा जीवंत देखावा मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण होते. याशिवाय शिववर्धन ढोल-ताशा पथक, टेंभुर्णीचे हलगी वाद्य पथक, बजरंगदल शंख नाद पथक मिरवणुकीत सहभागी झाले होते.

विश्‍वाला गरज शांततेची
देशाचे रक्षण करणारे प्रफुल्ल मोहरकरांसारखे जवान प्रत्येक घरात जन्मले पाहिजेत. प्रत्येक मुलावर त्याप्रमाणे संस्कार झाले पाहिजे. सध्या देशातच नाही तर संपूर्ण विश्‍वात शांततेची गरज आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी राज्यकर्ता विवेक संपन्न असला पाहिजे, असे डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांनी यावेळी सांगितले.