शिवरायांच्या कृतीतून बनली शिवविचारांची साखळी

औरंगाबादचे डॉ स्वप्नील चौधरी : शिवदर्शन सप्ताहात गुंफले सहावे पुष्प

भुसावळ : शिवरायांच्या आयुष्यातील प्रत्येक कृतीला नैतीकतेचे अधिष्ठान होते. त्यामागे त्यांचा प्रामाणिक व उदात्त हेतू होता. हजारो वर्षांचे संस्कार त्यात होते. याच विचारांची साखळी तयार होऊन त्याला शिवचरीत्रातील ऐतिहासिक, शास्त्रीय व धर्मोक्त संदर्भ दिल्यास सुंदर, पावित्र्य, धैर्य, सामर्थ्य, शौर्याचा एका सूत्रात बांधणारा शिवविचार आपल्याला दिसतो. शिवरायांनी आपले विचार कधी सांगितले नाही तर प्रत्यक्ष कृतीतून आपल्या विचारांचे दर्शन घडवले. त्यामुळे शिवरायांच्या प्रत्येक कृतीतून शिवविचारांची साखळी तयार झाली असल्याचे प्रतिपादन डॉ. स्वप्नील छाया विलास चौधरी (औरंगाबाद) यांनी केले.

महाराजांच्या प्रत्येक कृतीला वैचारीक अधिष्ठान
भुसावळ येथील छत्रपती शिवाजी महाराज बहुद्देशीय संस्थेतर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवदर्शन सप्ताहात सहावे पुष्प गुंफताना ते बोलत होते. शिवदर्शन सप्ताहाची संकल्पना डॉ. जगदीश पाटील यांची आहे. प्रारंभी शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला संस्थेचे अध्यक्ष संजीव पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी समन्वयक डी.के. पाटील, हभप लक्ष्मण महाराज, विमलबाई पाटील, डॉ.जगदीश पाटील, भक्ती व श्रद्धा उपस्थित होते. संजीव पाटील यांनी शिवदर्शन सप्ताह आयोजनामागची भूमिका मांडली. नाचण्यापेक्षा वाचण्याची व ऐकण्याची भूक आम्ही भागवत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘शिवछत्रपतींचा विचार हीच काळाची गरज’ या विषयावर बोलताना डॉ.स्वप्नील चौधरी म्हणाले की, शिवरायांच्या प्रत्येक कृतीला वैचारिक अधिष्ठान होते. त्याचे ऐतिहासिक, समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय संदर्भ उपलब्ध आहेत. शिवराय निर्व्यसनी जीवन जगले. त्यांनी नाचगाणे व अंधश्रद्धेला थारा दिला नाही.

अडचणींचे गड शिवविचारातून होतील दूर
छत्रपतींनी शिवरायांनी सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी सकारात्मकता जोपासली. सतत नाविण्याचा ध्यास, बहुभाषिकत्व, गुणपारखी, विश्वास, सलगी यासारखे गुण त्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून दिसतात. त्यामुळे शिवविचार घेताना आम्ही नेमके काय घेतले पाहिजे हे कळायला हवे. शिवरायांनी आपले विचार लिहून ठेवले नाही तर आपल्या कृतीतून त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. आज अनेकांसमोर अडचणींचे गड आहेत. ते शिवविचारातून दूर होऊ शकतात, असेही डॉ.चौधरी म्हणाले. शेवटी डॉ.स्वप्नील चौधरी यांनी स्वरचित ‘दंगल’ कविता सादर केली. यावेळी त्यांच्यासोबत देहू येथील डॉ.किशोर यादव उपस्थित होते. सूत्रसंचालन जयश्री काळवीट तर आभार प्रा.डॉ.गिरीश कोळी यांनी मानले.