भुसावळ : श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त “छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक” या विषयावर ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहंदळे यांचे ई-व्याख्यान रविवार, 31 रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आले आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाची स्थापना लोकमान्य टिळक यांनी केली असून रायगडावरील श्री शिवसमाधीचा जीर्णोध्दार मंडळाने केला आहे व गेली 125 वर्ष रायगडावर शिव अभिवादनाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. तसेच गत चार वर्षांपासून पुण्यात इतिहास अभ्यासकांसाठी शिवचरीत्र व मराठ्यांच्या इतिहासावर कार्यशाळा आयोजित केली जात आहे. या कार्यशाळेला महाराष्ट्रातील अभ्यासकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. हिंदवी स्वराज्याचे आरमारप्रमुख कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे सध्या मंडळाचे अध्यक्ष आहेत. हे व्याख्यान 31 मे रोजी सायंकाळी पाचला ‘ई-व्याख्यानमाला’ वेबसाइट आणि फेसबुकवरुन लाईव्ह प्रसारीतत होईल. गजानन मेहंदळे हे भारतातील प्रसिध्द इतिहासकार असून त्यांनी एक हजार पानांचे इंग्रजी व सुमारे अडीच हजार पानांचे मराठी शिवचरित्र लिहिले आहे. सर्व शिवप्रेमींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री शिवशंभू विचारदर्शनच्या वतीने करण्यात आले आहे.