महापालिका व ज्युनिअर इंजिनिअर असोसिएशनच्यावतीने अभियंतादिनानिमित्त कार्यक्रमाचे केले आयोजन
प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले प्रतिपादन
भोसरी : छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले स्थापत्यविषयक नियोजन अतिशय सूक्ष्म होते. सूक्ष्म नियोजन हा उत्तम व्यवस्थापनाचा भाग आहे. नियोजनामुळे महाराजांनी अनेक गड किल्ले, लढाया आणि स्वार्या सहज सर केल्या. त्यामुळे अभियंत्यांनी महाराजांप्रमाणे स्थापत्यविषयक कामाचे नियोजन करावे, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानगुडे- पाटील यांनी केले.
पिंपरी- चिंचवड महापालिका ज्युनिअर इंजिनीअर असोसिएशन आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने अभियंता दिनानिमित्त भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात (शनिवारी) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास इंजिनीअर असोसिएशनचे अध्यक्ष जयकुमार गुजर, कार्याध्यक्ष सुनील बेळगावकर, नगरसेवक विकास डोळस, संदीप वाघेरे, लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, कार्यकारी अभियंता मकरंद निकम, सतिश इंगळे, प्रवीण लडकत, श्रीकांत सवणे, प्रमोद ओंबासे, प्रशांत पाटील, संदेश चव्हाण, संजय कांबळे, संतोष कुदळे, भगवान मोरे, श्यामसुंदर बनसोडे, अभय कुलकर्णी आदी उपस्थित होते.
हे देखील वाचा
‘रायगड’ उत्तम उदाहरण
प्रा. बानगुडे पुढे म्हणाले की, सूक्ष्म नियोजनामुळे महाराजांनी कमी मनुष्यबळ आणि संसाधनात महत्वाची कामगिरी केली. प्रतापगडापासून ते पन्हाळगडापर्यंत अनेक गड किल्ले जिंकले व स्वराज्याची स्थापना केली. भारतात अभियांत्रिकी क्षेत्र प्राचिन काळापासून अस्तित्वात आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांची उभारणी करताना पाणी योजना, बंदिस्त गटार योजना, दळणवळण यंत्रणा, संरक्षण यासाठी भौगोलिक व खगोल शास्त्राचा अभ्यास करुन अभियांत्रिकीचा उत्तम वापर केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हिरोजी इंदलकर यांनी आपल्या कार्याच्या प्रती निष्ठा ठेवून दगडादगडात प्रामाणिकपणा भरुन केलेली रायगडाची बांधणी हे उत्तम वास्तुविशारदाचे उदाहरण आहे.
महाराजांचे दुरदृष्टीची उदाहरणे
समुद्र तटावर उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला, रत्नागिरी येथे जहाज बांधणी, सुरतमधील छापखाना, जमीन मोजणी व महसुलाची सुधारित पध्दती, खेड शिवापूर येथे बांधलेले महाराष्ट्रातील पहिले धरण ही महाराजांच्या दुरदृष्टीची, सामुहिक शक्तीच्या व्यवस्थापनाची आणि धैर्याची उदाहरणे आहेत. आपले निश्चित ध्येय, उद्दिष्ट गाठण्यासाठी कमीत-कमी खर्चात उत्तम नियोजन, कुशल व्यवस्थापन करुन यशस्वी कसे व्हावे यासाठी शिवचरित्राचा अभ्यास करावा. उद्याच्या पिढ्यांना हा समग्र इतिहास कळण्यासाठी गडकोट किल्ल्यांचे संरक्षण केले पाहिजे. ही शिवस्मारके जोपासली पाहिजेत अशी अपेक्षा प्रा. बानगुडे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण आंदोरे, पल्लवी ताटे यांनी केले. तर, सुनिल बेळगावकर यांनी आभार मानले.